
जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानी असलेल्या जपानच्या नाओमी ओसाकाने फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतून मंगळवारी तडकाफडकी माघार घेतली. सलामीच्या लढतीनंतर माध्यमांशी बोलणे टाळल्यामुळे ओसाकाला 15 हजार डॉलर्सचा दंड झाला होता. या कारवाईनंतर ओसाकाने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. 23 वर्षीय ओसाका नैराश्येच्या गर्तेत सापडल्यामुळे माध्यमांशी बोलणे टाळत होती, अशी माहिती आता समोर आली आहे.
नाओमीने फ्रेंच ओपन स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आपण माध्यमांशी बोलणार नाही, असे स्पष्ट केले होते. गेल्या वर्षीदेखील ती फ्रेंच ओपन स्पर्धेत खेळली नव्हती. या वर्षी नाओमीने सलामीच्या लढतीत रोमानियाच्या मारिया टिगचा पराभव करून स्पर्धेची झकास सुरुवात केली होती. मात्र लढतीनंतर प्रसारमाध्यमांशी न बोलल्यामुळे तिच्यावर दंडात्मक कारवाई झाली. स्पर्धेच्या आधीच प्रसारमाध्यमांशी न बोलण्याची भूमिका स्पष्ट केल्यानंतरही झालेल्या कारवाईमुळे नाओमी ओसाका दुखावली गेली. त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट टाकून तिने आपण स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
मी तीन वर्षांपासून नैराश्येत!
मी फ्रेंच ओपनमधून माघार घेतल्यामुळे आता इतर खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रीत करता येईल. इतरांसाठी मी कधीच अडथळा होऊ इच्छीत नाही. माझी वेळ चांगली नव्हती आणि माझा मेसेज अधिक स्पष्टपणे सांगण्याची गरज होती. खरं सांगायचं तर 2018च्या अमेरिकन ओपनपासून मी नैराश्येच्या गर्तेत आहे.


























































