
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागांतर्गत असणा-या पवई परिसरात मिठी नदीवर साधारणपणे सन 1940 च्या सुमारास बांधलेला एक जुना पूल होता. हा पूल अति धोकादायक झाल्याने डिसेंबर 2020 मध्ये तोडण्यात आला. त्यानंतर महापालिकेच्या पूल खात्याद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व पद्धतींचा वापर करुन केवळ 5 महिन्यांच्या अल्पावधीत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
तब्बल 34 मीटर लांबीचा आणि 24 मीटर रुंदी असणा-या या नव्या पुलाचे बांधकाम सुरु असताना महापालिकेच्या संबंधीत अधिकारी व कर्मचा-यांपैकी काहींना; तसेच सदर ठिकाणी काम करणा-या कंत्राटदाराच्या कर्मचा-यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या आव्हानावर यशस्वीपणे मात करुन पुलाचे बांधकाम विक्रमी वेळेत व नियोजनानुसारच पावसाळ्यापूर्वी करण्यात आले. या पुलामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक मार्ग आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी दिली आहे.
वरीलनुसार विक्रमी वेळेत म्हणजेच केवळ 5 महिन्यांत बांधण्यात आलेल्या पुलाबाबत व संबंधीत कार्यवाहीबाबत उप आयुक्त (पायाभूत सुविधा) तथा प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेंद्रकुमार तळकर यांनी दिलेली महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणेः-
1) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व उपनगरांमधील ‘एस’ विभाग व फिल्टरपाडा परिसरातून जाणारा साकी विहार मार्ग आहे. या मार्गाद्वारे पश्चिम उपनगरातील आरे कॉलनी परिसराला जाता येते. याच मार्गादरम्यान असणा-या मिठी नदीवर सन 1940 च्या सुमारास 20 मीटर लांबी व 7 मीटर रुंदी असणारा पूल बांधण्यात आला होता.
2) मिठी नदीवर असणारा सदर पूल डिसेंबर 2020 मध्ये धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर लगेचच सदर पूल पाडण्यात आला.
3) तथापि, पूल पाडल्यानंतर लोकांची गैरसोय होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन पूल पाडण्यापूर्वी सदर ठिकाणी तात्पुरता भराव टाकून एक तात्पुरता रस्ता पर्यायी स्वरुपात बांधण्यात आला. या तात्पुरत्या रस्त्याची उभारणी झाल्यानंतर जुन्या पुलाचे पाडकाम करण्यात आले.
4) सदर ठिकाणी नव्या पुलाचे बांधकाम हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुधारित पद्धतींचा अवलंब करण्याचे निश्चित करण्यात आले. यानुसार या नव्या पुलाचे बांधकाम अक्षरशः दिवसरात्र पद्धतीने करण्यात आले.
5) वरीलनुसार नव्या पुलाचे बांधकाम हे नुकतेच पूर्ण झाले असून हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. विशेष म्हणजे जुन्या पुलाची रुंदी ही केवळ 7 मीटर इतकी होती, या तुलनेत नव्या पुलाची रुंदी ही 24 मीटर इतकी आहे. म्हणजे जुन्या पुलापेक्षा हा पूल तिपटीपेक्षा अधिक रुंद आहे. तसेच पुलाची उंचीदेखील जुन्या पुलापेक्षा अधिक आहे. जुना पूल 6 मीटर उंच होता, तर नवीन पुलाची उंची 7 मीटर इतकी आहे.
6) या पुलाच्या दोन्ही बाजुला पादचा-यांसाठी १.२ मीटर रुंदीचे पदपथ देखील बांधण्यात आले आहे. तर पुलाच्या मध्यभागी सुमारे 2 मीटर रुंदीची जागा ही जलवाहिन्या व अन्य उपयोगितांसाठी सोडण्यात आली आहे. तसेच पुलाच्या दोन्ही मार्गिकांच्या दोन्ही बाजुला संरक्षित भिंत बांधण्यात आली आहे.






























































