
नगर जिल्ह्याचा कोरोना साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 4.30 टक्के आणि ऑक्सिजन बेडवरील रुग्णांचे एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडशी असलेले प्रमाण 24.48 टक्के दर्शविण्यात आले असल्यामुळे जिल्ह्याचा निर्बंधस्तर 1 मध्ये समावेश होतो. यामुळे उद्यापासून (दि. 7) नगर जिल्हा ‘अनलॉक’ झाला असून, सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना सुसंगत वर्तणुकीचे पालन करणे नागरिकांना बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज हे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, अत्यावश्यक वस्तूंशी संबंधित दुकाने/आस्थापना त्यांच्या नियमित वेळेत कार्यरत राहतील. बिगर अत्यावश्यक वस्तूंशी संबंधित दुकाने/आस्थापना त्यांचे नियमित वेळेत कार्यरत राहतील. मॉल, चित्रपटगृहे (मल्टीप्लेक्स तसेच सिंगल स्क्रिन), नाटय़गृहे 50 टक्के क्षमतेने नियमित वेळेत कार्यरत राहतील. रेस्टॉरंट नियमित वेळेत कार्यरत राहतील. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, जॉगिंग पार्क याठिकाणी वावर करण्यास निर्बंध असणार नाहीत. खासगी कार्यालये त्यांच्या नियमित वेळेत कार्यरत राहतील. सर्व शासकीय तसेच खासगी कार्यालये 100 टक्के उपस्थितीसह कार्यरत राहतील.
सर्व क्रीडाविषयक क्रियाकल्प चालू राहणार. चित्रीकरणांवर कुठलेही निर्बंध नाहीत. बंदिस्त सभागृहामध्ये लग्नाच्या आयोजनास एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के किंवा 100 व्यक्तीला परवानगी राहील. खुल्या जागेतील लग्न समारंभाला 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी राहील. अंत्यविधीस 50 व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी राहील.
स्थानिक स्वराज्य संस्था/सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा आयोजनास/निवडणुकांस निर्बंध असणार नाहीत. सर्व प्रकारचे बांधकाम क्रियाकल्प चालू राहतील. कृषीविषयक सर्व क्रियाकल्प चालू राहतील. वस्तू व सेवांचे ई-कॉमर्स व्यवहार चालू राहतील. व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर नियमित वेळेत चालू राहतील.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्बंधाविना चालू राहील. सर्व प्रकारची कार्गो वाहतूक (चालकासह जास्तीत जास्त 3 व्यक्तींसह) चालू राहील. खासगी कार / टॅक्सी / बस / दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे याद्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस मुभा असेल. तथापि, निर्बंधस्तर 5 क्षेत्रातून सुटणाऱया किंवा थांबा असणाऱया वाहतुकीदरम्यान सर्व प्रवाशांकडे ई-पास असणे बंधनकारक असेल. सर्व प्रकारची औद्योगिक केंद्रे त्यांच्या नियमित वेळेत चालू राहतील.
या आदेशान्वये चालू करण्यात आलेल्या सर्व ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणूक पालन करणे बंधनकारक असेल व याबाबतच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित अनुज्ञप्ती प्राधिकारी, स्थानिक प्राधिकरण, पोलीस विभाग, परिवहन विभागाची राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाचा आढावा घेऊन शासनाकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशान्वये या आदेशामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल. कोणीही आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


























































