
वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दीड महिना लॉक झालेली मुंबई आज अनलॉक होताच गर्दीने गजबजली. रस्ते आणि महामार्गांवर ट्रफिक जॅम झाले. उघडीप मिळताच अनेक भागांमध्ये नागरिकांची गर्दी दिसू लागली. बस स्टॉपवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या. हॉटेल आणि बाजारांमध्येही गर्दी झाली. सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला.
ऑक्सिजन असलेल्या बेडवरील रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हिटीचा दर यावरून राज्यातील जिह्यांचे पाच वर्गांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात मुंबई ही तिसऱया वर्गात आहे. आजपासून व्यायामशाळा पहाटे 5 ते 9 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी मिळाल्याने दीड महिना घरीच कसरत करणाऱयांनी व्यायामशाळा गाठली. गेला दीड महिना बंद असलेली दुकाने उघडण्यास परवानगी मिळताच आज सोमवार असूनही सलूनवाल्यांची दुकाने उघडी ठेवली होती. तिथे ग्राहक संख्याही मोठी होती.
अनलॉकच्या पहिल्याच दिवशी मुंबईसारख्या शहरातील ही परिस्थिती कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्यास कारणीभूत ठरू नये अशी आशा व्यक्त केली जात आहे. संसर्ग कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसू लागल्याने अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी अनलॉक करणे गरजेचे होते. या अनलॉकमागचा उद्देश सफल व्हावा यासाठी नागरिकांनीच काळजी घेण्याची गरज असल्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
z मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने सोमवारी पहिल्या दिवशी बेस्टच्या रांगा वाढल्याचे चित्र दिसले. बेस्टला संपूर्ण क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी मिळाली असली तरी उभे प्रवासी घेण्यास मनाई करण्यात आली असल्याने बस लवकर भरत असल्याने लांबच लांब रांगेत प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले.






























































