
सोलापूर मार्केटयार्डजवळील शेळगी पुलावर दुचाकी घसरून 16 शेतकरी जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी झालेल्या वडिलांना रस्त्याच्या कडेला बसवीत असताना दुसऱया गाडीने दिलेल्या धडकेत तरुण शेतकऱयाचा मृत्यू झाला आहे. जखमींवर शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहे.
महादेव कदम असे मृत शेतकऱयाचे नाव आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व मोहोळ परिसरातील शेकडो शेतकरी दुचाकीवरून भाजीपाला व अन्य शेतीचे उत्पादन विक्रीसाठी सोलापूरच्या मार्केटयार्डमध्ये येत असतात. या मार्केटयार्डजवळील शेळगी परिसरात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्ते अर्धवट खोदण्यात आले आहेत. परंतु या रस्तादुरुस्तीची माहिती देणारे फलक मात्र लावण्यात आले नाहीत.
आज बाबासाहेब अप्पाराव कदम आणि त्या त्यांचा मुलगा महादेव कदम हे दोघे आपआपल्या दुचाकीवरून भाजीपाला घेऊन मार्केटयार्डकडे निघाले होते. यावेळी त्यांच्याबरोबर आणखी 20 ते 25 शेतकरी दुचाकीवरून निघाले होते. शेळगी पुलाजवळ अचानक रस्ता खोदलेला असल्याने बाबासाहेब कदम यांची दुचाकी घसरली. यामुळे ते खाली पडले. महादेव कदम याने वडिलांना उठवून रस्त्याच्या कडेला बसविले. याच वेळी दुसऱया गाडीने महादेव कदम यांना धडक दिली. उपचारांसाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, यावेळी महेश ज्ञानेश्वर पवार, ज्ञानेश्वर मारुती पवार यांच्यासह 15 शेतकरी दुचाकींवरून घसरून जखमी झाले आहेत. हे शेतकरी गुळवंची, डळे, हगलूर, कंदलगाव येथील असून, महादेव कदम या तरुण शेतकऱयाच्या मृत्यूमुळे गुळवंची गावावर शोककळा पसरली आहे.



























































