
गेले अनेक दिवस इंजेक्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या 11 महिन्यांची चिमुकली वेदिका शिंदे हिला 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन आज देण्यात आले. गेले चार महिने जिवाचे रान करून पिंपरी-चिंचवड येथील सौरभ शिंदे यांनी आपल्या मुलीच्या दुर्मिळ आजाराच्या उपचारासाठी लागणारे 16 कोटी रुपये तीन महिन्यांत क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून जमा केले होते.
तीरा कामत या मुलीच्या दुर्मिळ आजारावर उपचार यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातील वेदिका शिंदे या पुण्यातल्या 11 महिन्यांच्या मुलीला एसएमए प्रकार-1 असल्याचे निदान केले. हा एक दुर्मिळ जेनेटीक आजार असून दोन वर्षांच्या आधीच शिशुचे प्राण जाऊ शकतात. वेदिकाला लागणारे जीन रिप्लेमेंटचे झोलजेन्स्मा हे औषध दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात अमेरिकेतून आले होते. ते आज वेदिकाला पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात देण्यात आले. वेदिकाच्या पालकांनी त्यांची समस्या फंडरेझिंग माध्यम मिलापवर सांगितली आणि जगभरातील ऑनलाइन दात्यांना मदतीची विनवणी केली. तीन महिन्यांच्या आत एकूण 14.3 कोटी रक्कम या अभियानाला समर्थन देणाऱया दात्यामुळे उपलब्ध होऊ शकली.



























































