महाराष्ट्रीय हॅकर मयूरची कमाल; इंस्टाग्रामवर ‘बग’ शोधला, FB कडून 22 लाखांची शाब्बासकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
instagram-lite

आयटी क्षेत्रात हिंदुस्थानी तरुणांची झेप आणि त्यावर असलेली पकड वेळोवेळी जगासमोर आली आहे. इथिकल हॅकिंगच्या दुनियेत देखील हिंदुस्थानी तरुण मागे नाहीत. असाच एक नमुना नुकताच जगासमोर आला आहे. एका हिंदुस्थानी हॅकरला फेसबुकनं 22 लाख रुपयांचं बक्षिस दिलं आहे. महाराष्ट्रातील मयूर नावाच्या डेव्हलपरने फेसबुकच्या इंस्टाग्राम सोशल प्लॅटफॉर्मवरील एक गंभीर चूक लक्षात आणून दिली आहे. हा असा ‘बग’ होता की ज्यामुळे कुणीही कुणाचं खासगी अकाउंट पाहू शकत होतं. मयूरचं हे वृत्त आजतकच्या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलं आहे.

इंस्टाग्रामवर तुम्ही एकमेकांचं अकाउंट तेव्हाच पाहू शकता जेव्हा तुम्ही एकमेकांना फॉलो करतात. मात्र इंस्टाग्रामवर असा एक बग होता ज्यामुळे कुणाचंही खासगी अकाउंट पाहू शकत होता. यासंदर्भात मयूरनं फेसबुकला याची सविस्तर माहिती दिली आणि फेसबुकनं देखील ही उणीव असल्याचं मान्य केलं.

मयूरनं चूक दाखवून दिल्यानंतर फेसबुकनं ही ती तात्काळ दुरुस्त केली आहे. तसंच ईमेल करत फेसबुकनं त्याला बक्षिस देखील जाहीर केलं आहे. या ई-मेलमध्ये म्हटलं आहे की, ‘मयूरला 30,000 डॉलरचं बक्षिस देण्यात येणार आहे.’

मयूरनं इंस्टाग्राममधील ही चूक 16 एप्रिल रोजी उजेडात आणली होती, फेसबुकने 15 जून पर्यंत चूक दुरुस्त केली. अशा प्रकारची चूक दाखवून दिल्यावर हॅकर्सना ती दुरुस्त होईपर्यंत ती कुणाला न सांगण्याची विनंती केली जाते. ज्यामुळे अन्य कुणी त्याचा गैरफायदा घेऊ शकणार नाही.