
पावसाळा सुरू होताच पर्यटकांना वेध लागतात ते अलिबागचे. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा. धबधब्याच्या धारा आणि गारेगार वारा झेलण्यासाठी तरूण-तरूणींच्या झुंडीच्या झुंडी येथे येतात, पण कोविडच्या संकटामुळे या आनंदाला काहीसा ‘ब्रेक’ लागला आहे. तरीही अनेक हौशी लोक कुछ नही होता है… असे म्हणत आपल्या गाड्या घेऊन रो-रो मधून येतात.
मात्र मांडवा जेट्टीवर पाऊल ठेवताच तुम्हाला अॅण्टीजन टेस्टला सामोरे जावे लागेल. पॉझिटिव्ह आलात तर थेट रवानगी हॉस्पिटलमध्ये. रो-रो तून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची टेस्ट होणार असून आधी अॅण्टीजन… मगच पर्यटन असे धोरण ठरविण्यात आले आहे. आरोग्य विभाग लवकरच विशेष मोहीम सुरू करणार आहे.
अनलॉकचे सरकारने जे मापदंड ठरवले आहेत त्यानुसार रायगड जिल्हा चौथा टप्प्यात असून 11 टक्के एवढा पॉझिटिव्ह रेट आहे. अजूनही जिल्ह्यात अंदाजे सहाज हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतच उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभात तसेच पोलीस अधिकार्यांची एकत्रित ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यात जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या पर्यटक व प्रवाशांवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई ते मांडवा दरम्यान रो-रो बोट सेवा सुरू असून सध्या चार फेऱ्या होत आहेत. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक ये-जा करतात. त्यातील प्रवाशांची मांडवा येथे अॅण्टीजन चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभाग पोलिसांच्या बंदोबस्तात अॅण्टीजन तपासणी केंद्र सुरू करणार आहे. याबाबत रोरो सेवा चालविणाऱ्या एमएमटुएम कंपनीचे अधिकारी व मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. या प्रवाशांकडे अठ्ठेचाळीस तासांच्या आतील आरटीपीसीआर रिपोर्ट नसेल अशा प्रवाशांची आरोग्य विभागाकडून चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. किरण पाटील यांनी बैठकीत दिली.
चेक पोस्टवरूनच परत पाठवणार
रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी चेक पोस्टवर गाड्यांची व प्रवास करणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. तेथूनच पर्यटकांना माघारी पाठवले जाईल. मात्र न ऐकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल.
गर्दीवर वॉच
गावागावांत सुरू असलेले गर्दीचे समारंभ, बंदी असतानाही सुरू असलेली दुकाने यावर प्रशासन विशेष वॉच ठेवणार आहे, तर शासनाने सुचविलेल्या निर्बंधांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा परिषद प्रशासन व पोलीस प्रशासनामार्फत मोहीम हाती घेतली जाणार आहे.

























































