
पाथर्डीतील जवखेड खालसा येथील सरगड वस्तीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद होण्याची घटना घडली. आज वनविभागाच्या पथकाने या बिबट्याला माळशेज घाटात सोडून दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, जवखेड खालसा या गावात गेल्या शुक्रवारी बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी दगावली होती. यानंतर ग्रामस्थांनी या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी वनविभागाकडे केल्यानंतर वनविभागाने तातडीने या ठिकाणी पिंजरा लावला होता. रविवारी रात्री आठच्या सुमारास बिबट्या परत एकदा सरगड वस्तीवर आला आणि अलगदपणे पिंजऱ्यात अडकला. त्याच्या ओरडण्याने ग्रामस्थांना बिबट्या जेरबंद झाला असल्याचे समजताच त्यांनी तातडीने ही माहिती वनविभागाला कळवली.
तिसगाव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघूलकर, वनपाल वैभव गाढवे, वनरक्षक कविता दहिफळे, विष्णू मरकड, कानिफ वांढेकर, गणेश पाखरे हे सरगड वस्तीवर गेले. त्यांनी या बिबट्याला ताब्यात घेऊन आज माळशेज घाटात सोडून दिले. यावर्षी वनविभागाने पकडलेला तालुक्यातील हा चौथा बिबट्या आहे. जवखेड खालसा येथे बिबट्याचा वावर असल्याचे लक्षात येताच गावात भीतीचे सावट निर्माण झाले होते, मात्र बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.




























































