समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण होणार; मुंबई महानगरपालिका व मे. आयडीई वॉटर टेक्नॉलॉजीज लि. यांच्यात सामंजस्य करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जनतेला पिण्याचे पाणी 24 तास उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी किती धरणे बांधायची आणि किती झाडे तोडून जमिनीचे वाळवंट करायचे? त्यापेक्षा पर्यायी मार्गाचा अवलंब करणे अगत्याचे आहे. हीच बाब विचारात घेऊन समुद्राच्या पाण्याचे निःक्षारीकरण करण्याचा प्रकल्प आता मूर्तरूप घेत आहे. 2025पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणीपुरवठा सुरू होईल. मुंबईसाठी निःक्षारीकरण प्रकल्प सुरू करणे हे क्रांतिकारी पाऊल असून आज आपल्या अनेक वर्षांच्या स्वप्नाला मूर्तरूप येत असल्याचे पाहून आनंद वाटत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात बृहन्मुंबई महानगरपालिका व मे. आयडीई वॉटर टेक्नॉलॉजीज लि.  यांच्यादरम्यान 200 दशलक्ष लिटर निःक्षारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, इस्रायलचे महावाणिज्यदूत याकोव फिन्केल्स्टाइन, वकिलातीमधील अन्य सदस्य, आयडीई वॉटर टेक्नॉलॉजीजचे पदाधिकारी,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, एमएमआरडीए आयुक्त एस. श्रीनिवास यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

किनारपट्टी भागात निःक्षारीकरण प्रकल्प उभारावेत – आदित्य ठाकरे

राज्याच्या किनारपट्टी भागात समुद्राच्या पाण्याचे निःक्षारीकरण करण्याचे छोटे छोटे प्रकल्प उभे करावेत. मालाड येथील 200 दशलक्ष लिटरच्या निःक्षारीकरण प्रकल्पाच्या डीपीआरसाठी होणारा सामंजस्य करार हे मुंबईकरांसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. भविष्यात 400 दशलक्ष लि. क्षमतेपर्यंत याचा विस्तार करता येऊ शकेल. पाणी सुरक्षिततेमध्ये इस्रायलचे काम खूप मोठे आहे तसेच त्यांचे तंत्रज्ञानही जगविख्यात आहे. कृषी आणि पाण्याच्या क्षेत्रात त्यांच्या सहकार्याने अनेक प्रकल्प राज्यात आणि देशात सुरू आहेत. पावसाची अनिश्चितता, वाढती लोकसंख्या आणि वाढती पाण्याची मागणी पाहता निःक्षारीकरणासारख्या प्रकल्पाचे महत्त्व विशेषत्वाने जाणवते, असे वक्तव्य पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

मनोरीतील प्रकल्पातून 200 दशलक्ष लिटर पाणी मिळणार

मालाडच्या मनोरी येथे होणाऱया प्रकल्पातून सध्या 200 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. भविष्यात 400 दशलक्ष लिटर क्षमतेपर्यंत विस्तार करण्याची यात क्षमता आहे. मे. 2022पर्यंत डीपीआर, तर 2025मध्ये प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा आहे. याद्वारे मुंबईकरांना 200 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून मनोरी, मालाड येथे उपलब्ध करून दिलेल्या जागेवर प्रकल्पाची अंमलबजावणी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून कमी जागेत प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रकल्प अहवाल 10 महिन्यांत तयार होईल. सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रकल्प बांधकामाकरिता मुंबई महानगरपालिकेतर्फे सविस्तर निविदा प्रक्रिया राबवून कार्यवाही केली जाईल.