
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास आज असमर्थता दर्शवली आहे. वय, आजारपण आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.
अनिल देशमुख यांना समन्स बजावून 29 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले होते. याबाबत देशमुख यांनी ईडीला पत्र पाठवून ‘मी जवळपास 72 वर्षांचा आहे, उच्च रक्तदाब आणि हृदयासंदर्भातील समस्या आणि विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त आहे. 25 जूनला तपास करताना आणि जबाब नोंदवताना मी बरेच तास आपल्याशी संवाद साधला. म्हणूनच, आज स्वतः उपस्थित राहणे योग्य नाही व मी माझा अधिकृत प्रतिनिधी पाठवत आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.


























































