भावाने बहिणीवर केले कुऱ्हाडीने वार; महिला जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरातील मोठया बहिणीमुळे आई-वडील किंमत देत नसल्याच्या रागातून भावाने घरात झोपलेल्या बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाड मारून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना गुरूवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हिंगणे खुर्द येथील साईनगर येथे घडली. मनीषा भीमराव हाटकर (रा.रामनगर, वारजे) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. शंकर भीमराव हाटकर (रा.देशमुख प्लाझा, साईनगर, हिंगणे खुर्द) याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहन लक्ष्मण पारधे (वय 18) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

रोहन पारधे व त्याची आई वारजेतील रामनगरमध्ये राहतात. त्यांची आई एका खासगी रुग्णालयामध्ये परिचारीका म्हणून काम करते. रोहनची आई हिंगणे खुर्द येथे राहणाऱ्या आईला नेहमी मदत करत होती. त्याशिवाय त्यांच्याकडे राहण्यासही जात होती. रोहन आणि त्याची आई बुधवारी रात्री आजी-आजोबांकडे गेले होते. रात्री जेवण करून सर्वजण झोपले होते. पहाटे 5.30 वाजता रोहनचा मामा शंकर हाटकर याने बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाड मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी साळुंखे करीत आहेत.