
देवरुख शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. देवरुख नगरपंचायतीने याकडे लक्ष देवून उनाड कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
देवरूख हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून ग्रामस्थ कामानिमित्त देवरुख येेथे येत असतात. येथील भटके कुुत्रे घराबाहेरील चप्पल पळविणे, वाळत घातलेले कपडे ओढून फाडणे, असा नाहक त्रास येथील नागरिकांना देतात तसेच देवरुख भूमिअभिलेख कार्यालय ते सावरकर चौक या मार्गावर कुत्र्यांचे टोळके वाहनचालकांचा पाठलाग करत असल्याचे बघायला मिळते.
चार दिवसांपूर्वी या कुत्र्यांनी दुचाकीचालकांना घेराव घालत त्यांच्यावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. या दुचाकीचालक तरुणांनी समयसूचकता दाखवल्याने संकट टळले. काही भटके कुत्रे अचानक वाहनांच्या आड येतात. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते.
गतवर्षी देवरुख नगरपंचायतीचे उनाड कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया मोहिम हाती घेतली होती. केवळ दोन वेळा ही मोहिम राबवण्यात आली. यानंतर या मोहिमेला ब्रेक लागला आहे. देवरुख नगरपंचायतीने नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्येकडे लक्ष केंद्रित करून उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.



























































