
कोवॅक्सिन कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मात्र असे असले तरी जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन सूचीत स्थान मिळालेले नाही. मात्र येत्या 4 ते 6 आठवडय़ांत यावर निर्णय होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले आहे. सेंटर फॉर सायन्स अॅण्ड इन्वायरमेंटने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये त्यांनी याबाबत सांगितले.
कोरोना लसनिर्मिती करणाऱया भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने कोवॅक्सिनसंदर्भातील 90 टक्के दस्ताऐवज जागतिक आरोग्य संघटनेकडे जमा केले आहेत. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि युरोपियन युनियनने अजूनही कोवॅक्सिनला आपत्कालीन मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी भारत बायोटेककडून आणखी माहिती मागवली आहे. ‘तिसऱया टप्प्यातील परीक्षण सुरू आहे. यासाठी सर्व आकडेवारी डब्ल्यूएचओच्या नियामक विभागाकडे जमा करावी लागते. त्यावर तज्ञ समिती अध्ययन करीत असते. त्यात सुरक्षा, प्रभाव आणि उत्पादन गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जाते. भारत बायोटेकने याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आशा आहे की येत्या चार ते सहा आठवडय़ांत कोवॅक्सिनला आपत्कालीन सूचीत स्थान मिळेल, असे स्वामिनाथन यांनी सांगितले.




























































