राहुरीत एक बिबट्या जेरबंद, दुसऱ्य़ा मादीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यात दोन घटनांमध्ये एक बिबट्या जेरबंद झाला असून, दुसरी बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळली आहे. राहुरी शहरातील येवले आखाडा आणि तालुक्यातील चेडगाव येथे सोमवारी या घटना उघडकीला आल्या आहेत.

पहिली घटना राहुरी नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील येवले आखाडा येथे उघड झाली. येवले आखाडा परिसरात अडीच वर्षांची बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळल्याने वन विभागाला खबर देण्यात आली. माहिती मिळताच वनसंरक्षक देवखिळे, वनक्षेत्रपाल पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भगवान परदेशी, वनरक्षक प्रणव निकम, कर्मचारी गोरक्षनाथ मोरे यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याच्या मादीचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनानंतर वन विभागाच्या डिग्रस नर्सरीत बिबट्याच्या मादीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर मादी बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

सोमवारी सकाळी तालुक्यातील चेडगाव येथे ताके यांच्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्य़ात दीड वर्षाचा नर बिबट्या जेरबंद झाला. या घटनेची खबर वाऱ्य़ासारखी परिसरात पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. बिबट्या पिंजऱ्य़ात जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनरक्षक सुवर्ण रायकर, वनकर्मचारी महादेव शेळके, बबन जाधव, रहिम पटेल यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक शेतकरी दीपक ताके, मेजर ताके, सार्थक ताके, शिवा ताके या शेतकऱयांच्या मदतीने पिंजऱ्य़ात जेरबंद झालेल्या बिबट्याला डिग्रस नर्सरीत हलविण्यात आले. वरिष्ठांचा आदेश येईपर्यंत या बिबट्याचा मुक्काम डिग्रस नर्सरीत राहणार असून, त्यानंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार आहे.

तीन बिबटे नैसर्गिक अधिवासात मुक्त

 नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलेले बिबटे : 9 मार्च – तालुक्यातील कोंढवड परिसर, 10 एप्रिल – देवळाली प्रवरा परिसर, 14 मे – बारागाव नांदुर परिसर, 12 जुलै – चेडगाव परिसरात नर बिबट्या जेरबंद झाला आहे. तर, वन विभागाच्या पिंजऱ्य़ात जेरबंद झालेल्या चारपैकी तीन बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले असून, आज पिंजऱ्य़ात जेरबंद झालेल्या बिबट्याचा डिग्रस नर्सरीत मुक्काम आहे.

5 महिन्यांत 6 बिबट्यांचा मृत्यू

1 मार्च ते 12 जुलै या कालावधीत राहुरी तालुक्यात सहा बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. मृतावस्थेत आढळलेले बिबटे : 1 मे 2021 रोजी कोल्हार परिसरात, 7 जून – कोंढवड परिसरात, 21 जून – दरडगाव थडी, 27 जून – कात्रड परिसर, 29 जून – चिंचविहिरे परिसर, तर 12 जुलैला राहुरी नगरपरिषद कार्यक्षेत्रातील येवले आखाडा येथे बिबटय़ाची मादी मृतावस्थेत आढळून आली आहे.