मुद्दा – जीवघेण्या महत्त्वाकांक्षा आणि स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सत्येंद्र राठी

‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे निसर्ग आपले काम अव्याहतपणे करतच असतो.नवी पालवी फुटते; आधीची पानं गळून पडतात, पण काही पानांना ओरबाडलंही जातं, तर काही स्वतःच झाडापासून फारकत घेतात.

विद्यार्थी स्वप्नील लोणकर, कलादिग्दर्शक राजू साप्ते यांनी जगाचा नुकताच घेतलेला निरोप हा या व्याख्येतच बसतो. अशा घटनेवरून समाज माध्यमांत उलथापालथ नाही घडली तरच नवल.

याआधी असाच हादरा शीतल आमटे यांनी सात महिन्यांपूर्वी दिला होता. प्रत्येकाच्या आत्महत्येमागे वैयक्तिक कारणे असली तरी एक सामाईक कारण सगळीकडे आढळून येते, ते म्हणजे नैराश्य आणि नैराश्याचे मूळ असते ती महत्त्वाकांक्षा. जगण्याच्या आकांक्षेला महत्त्वाची बाधा लागली की, निर्माण होते ती ‘महत्त्वाकांक्षा’.

बरं ही महत्त्वाकांक्षा एकटी येत नाही तर तिच्या पाठोपाठ ईर्ष्या, घृणा, क्रोध आणि सर्वात घातक म्हणजे तुलनाही येते. या तुलनेने एकदा मनात बस्तान बसविले की, मग जीवनात आनंदी होण्यापेक्षा यशस्वी होण्यासाठीची धावपळ सुरू होते आणि इथंच नेमकी चूक होते. शहरी जीवनात खासकरून कथित पुढारलेल्या समाजात पहिला क्रमांकावर येण्यासाठीचे संस्कार शालेय जीवनातच आग्रहपूर्वक बिंबवले जातात. इतकेच नव्हे, तर पुन्हा ते स्थान टिकवून ठेवण्यासाठीची मशक्कतही करण्यासही भाग पाडले जाते.

‘मोठी स्वप्ने पहा आणि ती प्रत्यक्षात उतरवा, स्वतःला झोकून द्या!’ असे आदर्श वाक्य बऱयाचदा अनेकांसाठी शाप ठरतात. कशातही थोडे मागे पडलो म्हणजे काही मोठे पातकच घडत असल्याची समूह भावना समाजव्यवस्थेत बळावत असल्याचेही दिसून येते. आज स्वाभाविक वाटणाऱया या गोष्टींमुळे पुढील आयुष्यात जीवावर बेतू शकेल याचा पुसट असा विचारही आपल्या मनात येत नाही. ही अहमहमिका आपल्या जगण्यातील सहजता हिरावून घेत असल्याचा गंधही आपल्याला नसतो.
आपली महत्त्वाकांक्षा, प्राप्त परिस्थिती आणि आपली क्षमता या त्रिसूत्रीचे संतुलन साधल्यास आपण बरेच गुंते सोडवू शकू. जीवनाकडून अपेक्षा तरी किती ठेवाव्यात! आपल्या प्रयत्नांना यश आलेच पाहिजे असा हट्ट धरून कसे चालेल.

समाजात एक मोठा वर्गही असा आहे की जो संघर्ष करीत आला दिवस ढकलत राहतो. त्यामुळे निराश होत नाही आणि अपेक्षा ठेवून किंवा निरपेक्ष वृत्तीने जीवन जगतो. या मंडळींची जीवनाकडून भलीमोठी अशी काही अपेक्षाच नसते. काही मिळविण्यापेक्षा जे मिळालंय त्यात सुखेनैव जगणे, जगण्याचे हे मर्म त्यांना माहीत असावे. कोणत्याही कामात नेमकेपणा, काटेकोरपणा यासाठी ती मंडळी कधीच आग्रही नसतात. परिस्थितीला बदलणे, त्यासाठी झगडणे यापेक्षा बदलत्या न येणाऱया परिस्थितीचा स्वीकार करणे हे त्यांच्या आनंदी असण्याचे समीकरण होय.

आपण योजलेल्या पद्धतीने आपले जगणे पुढे जात नसल्यामुळे, चढाओढीत मागे पडल्यामुळे, यामुळे आलेल्या विषण्णतेमुळे आत्महत्येसारखा आततायीपणा केला जात असावा. आपण कसे जगावे? याचे संविधान आखण्याचे अधिकार इतरांना दिल्यामुळे असे प्रकार घडतात. स्वतःला संपविण्यापेक्षा दोन पावलं मागे येत आपल्या समस्या संपविता आल्या किंवा त्या थोडय़ा सैल करता आल्या तर समस्येचे निराकरण होऊ शकेल. आपण आपल्या कर्मांना फलश्रुतीच्या ओझ्यातून मुक्त करू शकलो तर जगणे सुसह्य होईल. मानसोपचारांसाठी सर्वश्रेष्ठ असलेले पुस्तक ‘श्रीमदभगवद्गीता’ही याचाच पुरस्कार करते.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।