मंडणगड – बाणकोट किल्लावाडी मोहल्ल्यातील पिण्याच्या पाण्याची विहीर ढासळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाणकोट किल्लावाडी मोहल्ल्यासह किल्लावाडी तसेच बौध्दवाडीची वर्षोनुवर्ष तहान भागवणारी पिण्याच्या पाण्याची विहीर पुर्णपणे ढासळल्याने ऐन पावसाळयातच बाणकोटमधील या तिन्ही वाडयांना पाणी -पाणी करण्याची वेळ येणार आहे.

मंडणगडमध्ये रविवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. गेले पाच दिवस कोसळत असलेल्या पावसाच्या मुसळधारेने मंडणगडातील जनजिवन पार विस्कळीत करून टाकले आहे. पावसाच्या कोसळण्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. अनेक गावातील परे, नाले, ओढे, नदया , ओहोळ हे सध्या पाण्याची दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे.

प्लॅन्टेशनच्या नावाखाली होणारी बेसुमार जंगल तोड तसेच निसर्ग चक्री वादळात मोडून पडलेली मोठ-मोठी झाडे यामुळे आता जमिनीत पाणी शोशून घेणारी झाडांची मुळेच शिल्लक राहीलेली नाही आहे. यामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरून ठेवण्याची जमिनीची क्षमता संपली आहे. जमिनीत मुरणारे पाणी हे वाट मिळेल त्या दिशेने वाहून जमिनीचे भुस्खलन होवून दरी डोंगर खचण्याचे प्रकार अधिक वाढत चालले आहेत. अशातच आज गुरूवारी बाणकोट किल्लावाडी मोहल्ल्यानजिक पक्के बांधकाम केलेली पिण्याच्या पाण्याची विहीर ही ढासळून पुर्णतः जमिनदोस्त झाली. विहीरीचे नामोनिशानही शिल्लक राहीलेले नाही. त्यामुळे बाणकोट किल्लावाडी मोहल्ल्यासह, किल्लावाडी तसेच बौद्धवाडीचा ऐन पावसाळ्यातच विहीरीअभावी पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय बौद्धवाडीकडे जाणारा डांबरी रस्ताही खाली खचण्याचा प्रकार घडला असल्याने येथील रहीवाशांमध्ये घभराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे.