
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिंडोशी विधानसभा क्षेत्रात अनेक सामाजिक-लोकोपयोगी उपक्रम आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना खबरदारीचे नियम पाळून हे उपक्रम पार पाडले जाणार आहेत. शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या संकल्पनेतून हे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमांतर्गत दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील शाखांमध्ये स्वच्छता मोहीम, मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गरजूंना मोफत मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, हृदयचिकित्सा व त्यावर उपचार, मधुमेह तपासणी केली जाणार आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना मोफत छत्र्या वाटप, शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप, दिव्यांगांना व्हीलचेअर वाटप करण्यात येणार आहे. शिवाय दिंडोशी बस डेपोतील 2500 कामगारांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप, शाखांमधून कोविड विषाणूला रोखण्यासाठी स्टीमरचे वाटप, एस. के. पाटील रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप, लहान मुलांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी हेल्थ किट वाटप करण्यात येणार आहे. रक्तदान शिबिर व शिवसेना शाखा क्रमांक 44 च्या वतीने श्यामजी बापू सभागृहात 500 नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. यावेळी विधानसभा संघटक विष्णू सावंत, प्रशांत कदम, रीना सुर्वे, पूजा चौहान उपस्थित राहणार आहेत.
सवलतीच्या दरात डायलिसिस सुविधा
दिंडोशीमधील त्रिवेणी नगरमधील दिव्या अपार्टमेंटमध्ये रुग्णांसाठी पालिकेच्या वतीने हेमोडायलिसिस केंद्र उभारण्यात आले असून लाईफलाइन मेडिकेअर हॉस्पिटल संचालित माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे डायलिसिस केंद्रात 16 डायलिसिस मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सवलतीच्या दरात डायलिसिस सेवा मिळणाऱया या पेंद्राचे लोकार्पण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच प्रभाग क्र. 41 मध्ये पालिका शाळा क्र. 1 च्या पाच मजली नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळादेखील आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.





























































