अनिल देशमुखांची 4 कोटींची मालमत्ता जप्त, वरळीतील फ्लॅट ईडीच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’कडून जप्त करण्यात आली आहे. यासंदर्भात ईडीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांचे वसुली टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात न्यायालयाच्या निर्देशानुसार अनिल देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांची ईडी व सीबीआयमार्फत चौकशी सुरू आहे. याप्रकरणी सीबीआयने मूळ गुन्हा दाखल केलेला असून त्याच अनुषंगाने मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडीने देशमुख यांना तीन वेळा चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण प्रकृतीचे कारण देऊन ते चौकशीला हजर राहिले नाहीत. देशमुख यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलालादेखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.

ईडीकडून काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी छापे टाकण्यात आले होते. तसेच त्यांच्या दोन सचिवांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीकडून देशमुख यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे.

z उरणजवळील धुतूम गावात देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांच्या कंपनीकडून जमीन खरेदी करण्यात आली होती. त्या जमिनीतील काही फ्लॅटवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या जमिनीची किंमत 2 कोटी 67 लाख रुपये आहे.
z त्याचबरोबर देशमुख यांची नागपुरातील काही मालमत्ताही सील करण्यात आली आहे.

n अनिल देशमुख यांच्या वरळीमधील सुखदा या इमारतीमधील डुप्लेक्स फ्लॅटपैकी एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. हा फ्लॅट देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावावर आहे. या फ्लॅटची किंमत 1 कोटी 54 लाख रुपये आहे.