
शेखरू ही खारींची एक प्रजाती आहे. खारीच्या वर्गात येणारा हा प्राणी आकाराने मोठा असतो. हिंदुस्थानात जायंट स्क्विरल प्रजातीच्या एकूण 7 उपप्रजाती आढळतात. शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलात याचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र सह्याद्रीमध्ये वस्त्यालगत त्याची संख्या नजरेला भरण्याइतकी वाढली आहे.
झाडांवरून त्या झाडावर चिक्…चिक्… करत उड्या मारणारा शेजारून जाणारा वाटसरू काहीसा थांबून त्याला बघणार असे त्याचे सौंदर्य. त्याच्या तपकिरी रंगावर पांढरा पट्टा, शेपटीचा लांबलचक झुपकेदार गोंडा आणि त्याचं स्वतःच्याच जगात रमण असं काहीसं त्याच वर्णन. तो राज्य प्राणी ‘शेकरू’ आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील व चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये, कोयना अभयारण्यात पर्यटकाचे लक्ष वेधून घेत आहे. पक्षी जैवविविधता हिरव्यागर्द वनराईसाठी प्रसिद्ध असलेले जंगल या परिसरात या जिवाच्या लीला खूपच अधिक दिसत आहेत.
जैवविविधतेचा भरगच्चपणा आणि दिवसेंदिवस वन्यप्राण्यांचा अधिवास वाढू लागल्याने त्यांचे निश्चित सुरक्षित ठिकाण म्हणून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील व चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये व कोयना अभयारण्याची ओळख वाढत चालली आहे. या परीसरामध्ये तशी ‘शेकरू’ची संख्या खूपच वाढलेली दिसत आहे. खारीच्या कुळातील आकर्षक असलेला हा जीव येथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्यांच्या वाढत्या संख्येमुळे एक समृद्ध जंगल म्हणून या ठिकाणची ओळख होत आहे.
समूहाने राहणारा असला तरी शेकरू या प्राण्याची अनेक वेगळी लक्षणे आहेत. तो उंच झाडावर घरटी बांधतोच; पण एक शेकरू चार ते पाच घरटी बांधतो आणि आपल्या जोडीदार मादीला पसंत पडेल त्या घरट्यात संसार थाटतो. अशी घरटी या अभयारण्यात अनेक ठिकाणी दिसू लागली आहेत. नवजाधबधबा परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या जंगलामध्ये तसेच भैरवगड जंगल सफारीला जाणारा मार्ग आवारात अनेक वर्षे त्याचे अस्तित्व आहे. त्याचा या परिसरात वावर असल्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना येथील शेकरूंचा लळा लागला आहे. कोळणे नाका, रामबाण, कोयना, भैरवगड या ठिकाणी झाडांवर त्यांची वस्तीस्थाने आहेत. भैरवगड मंदिराचा परिसर आता या राज्य प्राण्यांचे हक्काचे ठिकाण बनले आहे. येथील उंबर, हिरडा आणि रानमेव्यांवर त्यांचाच हक्क आहे.
इवलासा पण राज्याचा प्राणी म्हणून मान मिळालेला जीव सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना अभयारण्यात बहर आणू लागला आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या भागात आता वन्यजीवांची संख्या वाढत आहे, हे निश्चितच प्रगतीचे आणि वन खात्याला अभिमानाचे आहे. अनेक ठिकाणी वस्तीस्थाने निर्माण झाली आहेत. हे समृद्धीचे लक्षण आहे. येथील वन्यजीवांच्या वाढीसाठी आणखी प्रयत्न सुरू आहेत. अशी माहीती हेळवाकचे वनक्षेत्रपाल अमित भोसले यांनी दिली.



























































