
अमेरिकेची 17 वर्षीय स्टार महिला टेनिसपटू कोको गॉफला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे तिचे स्वप्न भंगले. कोको गॉफने रविवारी रात्री उशिरा ट्विटरवर आपल्याला कोरोना झाल्याचे आणि ऑलिम्पिकमध्ये खेळणार नसल्याचे सांगितले.
जागतिक महिला टेनिस क्रमवारीत कोको गॉफ ही 25व्या स्थानावर आहे. तिने फ्रेंच ओपनची उपांत्यपूर्व फेरी आणि विम्बल्डनची चौथी फेरी गाठली होती. कोको गॉफ ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत आणि महिला दुहेरीत भागीदार निकोल मेलिचरसह भाग घेणार होती.
कोको गॉफने ट्विटमध्ये लिहिले, ‘‘मला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही. कोरोना झाल्याने मी फार निराश झाली आहे. ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणे हे माझे स्वप्न होते. या वेळी संधी हुकली असली तरी मला आशा आहे की भविष्यात हे वास्तव घडवून आणण्यासाठी माझ्याकडे आणखी बऱयाच संधी असतील. मला माझ्या संघाला आणि प्रत्येक ऑलिम्पियनला शुभेच्छा द्यायच्या आहेत.’’
ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या 12 सदस्यीय टेनिस संघाचे नेतृत्व कोको गॉफ करणार होती. सेरेना आणि व्हिनस विल्यम्सशिवाय 25 वर्षांत पहिल्यांदा अमेरिकेचा संघ खेळणार आहे. या संघातील इतर सदस्यांमध्ये महिला एकेरीत जेनिफर ब्रॅडी, जेसिका पेग्युला आणि ऑलिसन रिस्के, पुरुष एकेरीत टॉमी पॉल, फ्रान्सीस टियाफो, टेनिस सँडग्रेन आणि माकाxस गिरॉन यांचा समावेश आहे. बेथानी मॅटेक-सँड्स, राजीव राम आणि ऑस्टिन व्रेजिसेक हे संघाचे अन्य सदस्य आहेत.

























































