
मुंबईत गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला पावसाचा जोर कायम असून आज दिवसभर संततधार सुरूच होती. हवामान खात्याने मुंबईत आणखी तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ‘सावधगिरीचा ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईत पावसाचा जोर कायम असून आगामी काळात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आजच्या पावसात लोकल सेवा सुरळीत असून काही भागात वाहतूककाsंडी वगळता रस्ते वाहतूकही सुरळीत होती. समुद्राला सकाळी 10.45च्या सुमारास 4.39 मीटरच्या लाटा समुद्रात उसळत होत्या. मात्र भरतीच्या वेळी अतिवृष्टी झाली नसल्याने पाणी तुंबले नाही. त्यामुळे मुंबईतील व्यवहार सुरळीत राहिले. दरम्यान, मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत आणखी दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून 24 तासांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
अशी झाली पडझड
पूर्व उपनगरात दोन आणि पश्चिम उपनगरात 4 ठिकाणी घर व घराच्या भिंती कोसळल्या. शहर भागात 10 पूर्व उपनगरात 8 व पश्चिम उपनगरात 12 अशा एकूण 30 ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या कोसळल्या. त्यात अंधेरी तक्षशिला पोलीस चौकी येथे एकजण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर शॉर्टसर्किटच्या दहा घटना घडल्या. तर बुधवारी रात्री मरोळ येथे सैफी मंझील को-ऑप सोसायटी येथे डोंगरावरील काही दगड खाली आल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही.
धोकादायक दरडींजवळील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करा!
मुंबईत चेंबूर आणि विक्रोळी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 32 जणांचा बळी गेल्यामुळे अशा अतिधोकादायक ठिकाणी राहणाऱया रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी कार्यवाही करा, असे निर्देश आज स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले. मुंबईत तब्बल 291 ठिकाणी दरडींचा धोका असल्याने पालिकेने संबंधित रहिवाशांना खबरदारीसाठी आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी पावसाळ्याआधी नोटीस बजावल्या आहेत. याचा आढावा घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देशही यावेळी देण्यात आले. मुंबईत 291 ठिकाणे असून त्यातील 200 हून अधिक ठिकाणे ही कुर्ल्यापासून मुलुंड पश्चिमपर्यंतच्या भागातील आहेत. विक्रोळीपासून भांडुप पश्चिमपर्यंत तब्बल 132 आणि घाटकोपरमध्ये 32 ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे.
असा झाला पाऊस
मुंबई शहर – 74.29 मि. मी.
पूर्व उपनगर – 60.17 मि. मी.
पश्चिम उपनगर – 71.46 मि. मी.



























































