आईच्या काळजीपोटी मुलांनी बनवली अनोखी कचरापेटी, मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी ठरणार फायदेशीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनापासून बचावासाठी मास्क घालणे बंधनकारक आहे. मात्र काही लोक मास्क वापरून झाल्यावर निष्काळजीपणे तो रस्त्यावरच इतरत्र फेकतात. सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱया आपल्या आईला हे मास्क उचलावे लागतात, यातून कोरोनाचा धोका उद्भवू शकतो. आईच्या याच काळजीपोटी वाराणसीमध्ये राहणाऱया 12 वर्षीय आयूष आणि रेश्मा भाऊ-बहिणीने स्मार्ट डस्टबीन तयार केले आहे. यामुळे मास्कची विल्हेवाट लावता येणे शक्य होणार आहे.

आयूष आणि रेश्मा यांची ज्या शाळेत शिकतात त्याच शाळेत त्यांची आई सफाई कर्मचारी म्हणून काम करते. इतरांनी रस्त्यावर फेकलेले मास्क त्यांनी आपल्या आईला उचलताना पाहिले. तेंव्हा आपल्या आईसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात आला. यातूनच त्यांना स्मार्ट डस्टबीनची आयडिया सुचली. स्मार्ट डस्टबीन पूर्णपणे लोखंडी असून त्यात हिटर बसवण्यात आला आहे. यात मास्क टाकला की हिटर सुरू होऊन मास्क जळून खाक होतो.

तीन फूट उंचीच्या डस्टबीनसाठी त्यांना 3500 रुपये खर्च आला आहे. डस्टबीनमध्ये त्यांनी सेन्सर बसवला आहे. एखादी व्यक्ती जवळ येताच त्याचे झाकण आपोआप उघडते. ऑटो आणि मॅन्युअल अशा दोन्ही पद्धतीने डस्टबीन ऑपरेट केला जाऊ शकतो.