पुण्यात टोळक्याच्या गोळीबारात गुंड जखमी; शिवणेतील स्मशानभूमीजवळ गोळीबाराचा थरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवण करून मोटारीतून घराकडे जाणाऱ्या गुंडाचा पाठलाग करत टोळक्याने त्याच्यावर गोळीबार केला. ही घटना रविवारी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास शिवणे ते एनडीए रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ घडली. गोळीबारात केदार शहाजी भालशंकर (वय 24, रामनगर, वारजे) जखमी झाला आहे. याप्रकरणी निलेश गायकवाडसह साथीदारांविरूद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार आणि तीन मित्र रविवारी रात्री कात्रज परिसरात जेवणासाठी गेले होते. त्यानंतर मोटारीतून माघारी परतत असताना एनडीए स्मशानभूमीजवळ दुचाकीवर आलेल्या चार ते पाचजणांनी त्यांच्या मोटारीवर दगड मारून काच फोडली. मात्र, अंधार असल्यामुळे केदारने गाडी काही अंतरावरील एका मंदिराजवळ थांबवली. त्यावेळी त्याच्या ओळखीचा निलेश गायकवाड साथीदारांसोबत आल्याचे त्याला दिसले. त्या टोळक्याने केदारच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. टोळक्याने सहा राउंड झाडल्यामुळे त्यातील एक गोळी केदारच्या पाठीत लागली. गोळीबारात जखमी झालेल्या स्थितीतही त्याने मोटार वारजे पोलीस ठाण्याकडे नेली. तोपर्यंत टोळक्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.