
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना पुन्हा एकदा पुढे सरसावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महानगर टेलिफोन निगम कामगार संघाच्या ‘जाणीव ट्रस्ट’च्या माध्यमातून पूरग्रस्तांना मोलाची मदत नुकतीच सोपविण्यात आली आहे. त्याबरोबरच खासदार अरविंद सावंत यांनी येथील उद्योगधंद्यांचीदेखील पाहणी केली असून त्यांना मदतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
शिवसेना खासदार आणि भारतीय कामगार संघाचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी नुकतीच चिपळूण शहर व सभोवतालच्या गावांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या भेटीत महानगर टेलिफोन निगम कामगार संघाच्या ‘जाणीव ट्रस्ट’ च्या वतीने गरजूंना संसारोपयोगी साहित्याचे वाटप केले. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, सदानंद चव्हाण, सचिन कदम, उमेश सकपाळ, जाणीव न्यासाचे दिलीप जाधव, प्रकाश शिरवाडकर, दिलीप साटम, दत्ता भोसले आदी उपस्थित होते. यावेळी अरविंद सावंत यांनी खेर्डी औद्योगिक वसाहतीलादेखील भेट देत येथील उद्योजकांशी संवाद साधला. नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल त्यागी, उपाध्यक्ष गजानन कदम यांनी येथील उद्योजकांच्या नुकसानीबाबत माहिती दिली तसेच सविस्तर निवेदन सादर केले.























































