
राज्यातील पदवी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएसस्सी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागा बारावी उत्तीर्ण विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत कमी असल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 20 टक्क्यांपर्यंत तुकडीवाढीचा निर्णय घेतला आहे. यानुसार मुंबई विद्यापीठाने संलग्नित कॉलेजना पदवी प्रवेशाच्या जागावाढीसाठी ऑनलाइन प्रस्ताव पाठविण्यासाठी दिलेली मुदत उद्या 19 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता संपणार आहे. प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया वेळेत पार पाडण्यासाठी कॉलेजनी जागावाढीचे प्रस्ताव दिलेल्या मुदतीत सादर करावेत. मुदतीनंतर येणार प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत स्वीकारण्यात येणार नाहीत, अशा स्पष्ट सूचना मुंबई विद्यापीठाने जारी केल्या आहेत.
बारावीत यंदा 13,4,965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यांपैकी सुमारे 10 ते 12 टक्के विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माण व वास्तुशास्त्र तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. मुंबई विद्यापीठांतर्गत बहुसंख्य नामांकित कॉलेजांचे बारावीचे निकाल 100 टक्के लागले आहेत. त्यामुळे या कॉलेजना जागा वाढवून दिल्याशिवाय ऑनलाइन प्रवेशअर्ज करणाऱया बाहेरील विद्यार्थ्यांना त्या कॉलेजात प्रवेश मिळणार नाही. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून नामांकित कॉलेजांमध्ये जागा वाढवून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 (8) मध्ये असामान्य परिस्थितीत विशिष्ट विद्याशाखांच्या अतिरिक्त नवीन तुकडय़ंना जलदगतीने मान्यता देण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार जागावाढीसाठी मान्यता देण्यात येणार असल्याचे उच्च शिक्षण संचालनालयाने सष्ट केले आहे.
मुंबई विभागातील उत्तीर्ण विद्यार्थी
सायन्स 80,203
कॉमर्स 1,65,032
आर्टस् 43,912
एकूण 2,94,090
श्रेणीनिहाय उत्तीर्ण
विशेष प्रावीण्य 1,34,675
प्रथम श्रेणी 1,27,256
द्वितीय श्रेणी 30,574
उत्तीर्ण 972



























































