
मित्रासोबत गप्पा मारत बसलेल्या तरूणावर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपींना अवघ्या एक तासाच्या आत अटक करण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले आहे. शैलेश उत्तरेश्वर बिडवे (वय 35, रा. उबाळेनगर, वाघोली), किशोर चंद्रकांत व्हडले ऊर्फ आचारी (वय 27, रा. खांदवेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अक्षय अनिल कवडे (वय 25, रा. कावडे वस्ती वाघोली) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
तक्रारदार अक्षय आणि गणेश 24 ऑगस्टला एका हॉटेल जवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे संतोष ऊर्फ गट्टया आणि आव्हाळे दुचाकीवरून आले. ‘तु गट्टया आव्हाळेला नडतोस काय? तुला खल्लासच करून टाकतो’ असे म्हणून त्यांनी अक्षयला शिवीगाळ करीत कोयत्याने वार केले. त्याचवेळी गट्टया आव्हाळेचा मित्र शैलेश बिडवे यानेही अक्षयवर कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केले. आरडाओरडा करीत ‘अक्षयला कोण वाचवायला येते तेच पाहू’ असे म्हणत दहशत निर्माण केली.
याप्रकरणी लोणीकंद पोलीस तपास करत असताना पोलीस नाईक कैलास सांळुके आणि विनायक साळवे यांना आरोपी वाघोली येथे थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, राजेश तटकरे, तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, मोहन वाळके, अजित फरांदे, कैलास साळुके,विनायक साळवे, जाधव, समीर पिलाणे, बाळासाहेब तनपुरे यांनी केली.






























































