
पुणे शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य केले जात आहे. महिलांचे दागिने आणि पादचाऱ्यांकडील मोबाइल लांबविण्याच्या घटना वाढल्या आहेत. धनकवडी परिसरात पादचारी महिलेकडील 68 हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली. सिंहगड रस्त्यावर दुचाकीस्वार महिलेचे दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार महिला धनकवडीतील आंबेगाव पठार भागात राहायला आहे. शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आंबेगाव पठार परिसरातून महिला निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 68 हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता अधिक तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत दुचाकीस्वार महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. याबाबत एका महिलेने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दोन दिवसांपूर्वी महिला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुलगा आणि मुलीसह दुचाकीवरून धायरी पुलाकडे निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 35 हजारांचे मंगळसूत्र हिसकावले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक के. एस. तनपुरे अधिक तपास करत आहेत.




























































