मुंबईकरांनो काळजी घ्या! 12 दिवसांत मलेरियाचे 210 तर डेंग्यूचे 85 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्य़ा लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज झाली असताना आता मलेरिया आणि डेंग्यूचे संकट मुंबईकरांसमोर उभे राहिले आहे. गेल्या 12 दिवसांत मलेरियाचे 210 तर डेंग्यूचे 85 रुग्ण सापडले असून त्यामुळे पालिका सतर्क झाली आहे. मलेरिया, डेंग्यू याच्याबरोबरच लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ तर स्वाईन फ्ल्यूचेही रुग्ण आढळल्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

मुंबई महापालिका कोरोनाविरोधात यशस्वी उपाययोजना करत असतानाच जुलैपासून डेंग्यू, मलेरियासह पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. सुदैवाने, पावसाळी आजारांमुळे सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

भायखळा, प्रभादेवी, दादर, माहीममध्ये रुग्ण जास्त

मुंबईत 12 सप्टेंबरपर्यंत डेंग्यूचे 85 रुग्ण आढळले असून सर्वाधिक रुग्णे ई विभाग (भायखळा, ताडदेव), जी-दक्षिण (वरळी, प्रभादेवी, लोअर परळ) आणि जी-उत्तरमध्ये (दादर, माहीम, धारावी) सापडले आहेत तर मलेरियाचे 210, लेप्टोचे 18, गॅस्ट्रोचे 92, कावीळचे 14 तर स्वाईन फ्ल्यूचे 6 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, पालिकेच्या कीटकनाशक विभागाने मलेरिया आणि डेंग्यूच्या अळ्यांचा शोध घेऊन त्या नष्ट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून गेल्या 12 दिवसांत 4 लाख 46 हजार 77 घरांची तपासणी करून 4 हजार 108 डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट केल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

ई, जी-दक्षिणमध्ये डेंग्यू, मलेरियाविरोधात मोहीम तीव्र

पालिकेच्या ई विभागात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. जी-दक्षिण विभागातही डेंग्यू, मलेरियाचा धोका लक्षात घेऊन ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी सुरू आहे. आतापर्यंत जे रुग्ण सापडले आहेत ते सर्व पालिकेने राबवलेल्या आरोग्य शिबिरे, घरोघरी केलेल्या तपासणीदरम्यान आढळले आहेत.

जी-उत्तर विभागातील दादर, माहीम, धारावीत मलेरियाविरोधात जूनपासून झिरो मलेरिया मोहीम राबवली जात आहे. तसेच एखाद्या ठिकाणी तापाचे रुग्ण सापडले तर तिथे आरोग्य शिबीर राबवून तपासणी केली जात असून येत्या काळात ही मोहीम तीव्र करणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. वीरेंद्र मोहिते यांनी सांगितले.

1 जानेवारी ते 12 सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी

मलेरिया – 3,606

लेप्टो – 151

डेंग्यू – 305

गॅस्ट्रो – 1,964

कावीळ – 179

स्वाईन फ्ल्यू – 52