
आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे भंगारातील सामानापासून जुगाड करत नवनवीन वस्तू तयार करतात. अशाच जुगाडामुळे सध्या नववीतील एका विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यार्थ्याने चक्क भंगारापासून इलेक्ट्रिक बाईक तयार केली आहे. एका चार्जिंगमध्ये ही बाईक 100 किमी अंतर कापू शकते असा दावा या विद्यार्थ्याने केला आहे.

राजन असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो दिल्लीतील सुभाषनगर येथे राहतो. तो अवघ्या 15 वर्षांचा आहे. त्याने व्रॅपमधून रॉयल एनफिल्ड बुलेट विकत घेतली आणि तिचे रूपांतर इलेक्ट्रिक बाईकमध्ये केले आहे. याबाबत राजनने सांगितले, यापूर्वी मी इलेक्ट्रिक सायकलची निर्मिती केली होती, मात्र माझा हा प्रयत्न फसला होता. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करत मी इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती करायचे ठरवले. शाळा बंद असल्याने जवळच्या एका गॅरेजमध्ये मी काही टेक्निकल गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर वडिलांना भंगारातून एक बाईक विकत घ्यायला लावली. काही सुटे पार्टदेखील विकत घेतले. अवघ्या 45 हजार रुपयांत ही इलेक्ट्रिक बाईक तयार झाली आहे. विविध सामानाची जमवाजमव करण्यासाठी राजनला एक महिन्याचा कालावधी लागला आहे. या बाईकमध्ये 48 व्होल्टचे चार्जर असून घरच्या घरी बाईकची बॅटरी चार्ज करता येऊ शकते, असे राजनने सांगितले.



























































