भाजपच्या आंदोलनाचा शिवसेनेकडून ‘समाचार’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या वैधानिक समित्यांच्या सभा प्रत्यक्ष घ्याव्यात, पत्रकारांना उपस्थित राहण्यास परवानगी द्यावी आणि ‘बेस्ट’च्या तिकीट प्रणाली प्रस्तावात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत आंदोलन करणाऱया भाजपचा आज शिवसेनेने चांगलाच ‘समाचार’ घेतला. ‘बेस्ट’ तिकीटचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले असून प्रत्यक्ष सभांसाठी भाजपने आयुक्तांकडे आंदोलन करावे असा सल्ला महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

भाजपच्या नगरसेवकांनी आज महापौरांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे भाजपच्या मुद्दय़ांसंदर्भात महापौरांनी चर्चा करण्याचे मान्य केले असताना आंदेलन करून घोषणाबाजी केली. त्यामुळे हे आंदोलन म्हणजे भाजपची ही स्टंटबाजी असल्याचे महापौरांनी सांगितले. वैधानिक सभा प्रत्यक्ष सभा घेण्यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आणि नियमानुसार या बैठका घेतल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपकडे सध्या कोणतेही मुद्दे नसल्याने भाजप नाहक राजकारण करीत असल्याचा टोला सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी लगावला.

निवडणुका जवळ आल्यानेच भाजपची स्टंटबाजी

कोरोना काळात लोकल बंद असताना ‘बेस्ट’नेच आधार दिल्याने मुंबई ‘सुरू’ राहिली. एका अर्थाने भाजपलाही शिवसेनेनेच जगवल्याचा टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी लगावला. शिवसेनेने केलेल्या कामांमुळे गेल्या 25 वर्षांपासून मुंबईकरांनी शिवसेनेला साथ दिल्याने पालिकेत सत्ता राहिली आहे. तेव्हा भाजपही शिवसेनेसोबत होती. मात्र आता निवडणुका जवळ आल्यानेच नाहक आरोप केले जात असल्याचे जाधव म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई आणि महाराष्ट्राने कोरोनाविरोधात यशस्वी लढा दिल्याने भाजपला पोटशुळ उठल्याचा घणाघातही त्यांनी केला.