परळी तालुक्यातील लाडझरीत भूगर्भातुन आवाज; भूजल सर्वेक्षण विभागाचे पथक करणार पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
earthquake-measurement

परळी तालुक्यातील मौजे लाडझरी येथे सोमवारी अचानक भूगर्भातून आवाज येऊ लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, हे आवाज नेमके कशामुळे येत आहेत, याची माहिती मिळालेली नाही.सोमवारी सकाळी 8.30 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत एकूण सात वेळा आवाज आल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास भूगर्भातुन आलेला आवाज व यामुळे बसलेला हादरा मोठा असल्याने लाडझरी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाला माहिती मिळताच आवाज येत असलेल्या ठिकाणी तलाठी ग्रामसेवक, मंडळ अधिकाऱ्यांनी भेट देत याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली आहे. आवाज येत असलेल्या ठिकाणी मंगळवारी भूजल सर्वेक्षण विभागाचे पथक पाहणी करणार आहे. त्यानंतरच याबद्दलची अधिक माहिती मिळेल, असे परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी सांगितले.

याआधीही परळी तालुक्यातील मोहा येथे येत होते आवाज
नागरिकांनी भयभीत होऊ नये या सर्व प्रकारावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. याआधीही पावसाळ्यात तालुक्यातील मोहा येथे भूगर्भातून असेच आवाज येत होते. मात्र संशोधनानंतर जास्त झालेल्या पावसाने भूगर्भातून असे आवाज येत असल्याचे समोर आले. यंदा पाऊस जास्त झाल्याने भूगर्भातून हे आवाज येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी दिली.