
पनवेल येथील एका व्यापाऱयाला जाळ्यात ओढत तब्बल पाच लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नगर शहरात उघडकीस आला आहे. ओळख तयार करून उकळलेले पैसे परत करण्यास नकार देत अश्लिल फोटो व व्हिडीओ तयार करून सोशल मीडियात व्हायरल करण्याची, खोटय़ा गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याची तक्रार या व्यापाऱयाने कोतवाली पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी केडगाव येथील एका महिलेसह तिच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ‘हनीट्रॅप’चा प्रकार नगर शहरात उघकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
सदर व्यापारी व महिलेची सहा वर्षांपूर्वी ओळख झाली होती. नंतरच्या काळात या दोघांचे बोलणे बंद झाले होते. दोन महिन्यांपूर्वी या महिलेने व्यापाऱयाला फोन करून केडगाव येथे भेटण्यास बोलाविले. आर्थिक अडचण असल्याचे तिने सांगितल्याने सदर व्यापारी 8 ऑगस्ट 2021 रोजी तिला मदत करण्यासाठी दोन मित्रांसमवेत केडगाव येथे आला व त्या महिलेच्या घरी जाऊन तिला भेटला. यावेळी महिलेचा भाऊही तेथे होता. आर्थिक अडचण असल्याचे सांगितल्याने व्यापाऱयाने तिला 50 हजार रुपये दिले. त्यानंतर सदर महिलेने व्यापाऱयाशी जवळीक साधत त्याला गोड बोलून जाळ्यात ओढले. दोघांमध्ये कायम संवाद सुरू होता. सदर व्यापारी महिलेला भेटण्यासाठी केडगाव येथे येत होता. यावेळी सदर महिला व तिचा भाऊ व्यापाऱयाला आर्थिक अडचणीचे कारण देत पैशांची मागणी करत होते. व्यापाऱयाने कधी रोख, तर कधी फोन पे वरून असे एकूण 5 लाख रुपये दिले.
काही दिवसांपासून 15 सप्टेंबर रोजी व्यापारी ड्रायव्हरसह केडगाव येथे सदर महिलेच्या घरी गेला व त्याने वेळोवेळी दिलेले एकूण 5 लाख रुपये परत मागितले. यावेळी सदर महिला व तिच्या भावाने व्यापाऱयाला धमकी देत ‘तू आम्हाला पैसे दिले नाही, तर तुला खोटय़ा गुन्ह्यात अडकवू, तुझे अश्लील फोटो आमच्याकडे आहेत. त्याचे आम्ही अश्लील व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पसरवून तुझी बदनामी करू’, अशी धमकी देत व्यापारी व ड्रायव्हरला धक्काबुक्की केली. यावेळी व्यापाऱयाच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची चेन, दोन एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून घेतले. आणखी पाच लाखांची मागणी करत खोटय़ा गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी व्यापाऱयाच्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे तपास करीत आहेत. सदर प्रकार ‘हनीट्रॅप’सारखाच असून, पोलीस तपास करत असल्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी सांगितले.


























































