
राज्य शासनाने मंदिरे उघडण्यासाठी मंजुरी दिल्यानंतर शिर्डीचे श्री साई मंदिर 7 ऑक्टोबर रोजी उघडण्यात येणार आहे. शिर्डी व आजूबाजूच्या परिसरातील दुकाने, हॉटेल, लॉज व अन्य व्यावसायिक आस्थापना येथे भाविकांची गर्दी होईल, या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यावसायिक आणि त्यांच्या आस्थापनांवर कार्यरत कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हावे, यासाठी राहाता तालुका आरोग्य विभाग व शिर्डी नगर पंचायतीतर्फे 1 ते 6 ऑक्टोबरदरम्यान विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेद्वारे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शिर्डी शहर व परिसरातील 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.
शिर्डी नगरपंचायतीतर्फे 24 तास कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, नागरिकांनी 18002335150 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. शिर्डी शहरातील लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या व्यावसायिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. लस न घेतलेले व्यावसायिक अथवा कर्मचारी तपासणीदरम्यान आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राहाता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के व शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केले आहे.
लसीकरण मोहिमेचा तपशील
1 ऑक्टोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. 2 ऑक्टोबर श्री साईनाथ हायस्कूल. 3 ऑक्टोबर आदर्श माध्यमिक शाळा. 4 ऑक्टोबर ऊर्दू हायस्कूल, कनकुरी रोड. 5 ऑक्टोबर जिल्हा परिषद शाळा, बिरेगाव बन आणि 6 ऑक्टोबर काशी अन्नपूर्ण सत्रम, पानमळा रोड, येथे लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.


























































