
माथेरानच्या जंगलात बेपत्ता झालेल्या गिर्यारोहकाचा मृतदेह सापडला आहे. जवळपास सात दिवस त्याचा शोध सुरू होता. अखेर सात दिवसांनी एका घळीत तो मृतावस्थेत आढळला.
निशांत गुप्ता (18) असं या गिर्यारोहकाचं नाव आहे. तो चांदिवलीचा रहिवासी आहे. 26 सप्टेंबर रोजी तो घरातून ट्रेकिंगसाठी निघाला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता.
त्याच्या कुटुंबाने तो बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवली होती. माथेरान पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू झाली. मात्र, माथेरानच्या खालच्या दरीत घनदाट जंगल असल्याने त्याचा शोध लागला नाही.
अखेर, सह्याद्री रेंज रेस्क्यू टीमच्या मदत घेण्यात आली. त्यांनी दरीत जवळपास 36 तास शोध घेतला. तरीही त्यांना निशांतचा माग काढता आला नाही. अखेर 2 ऑक्टोबर रोजी स्थानिक आदिवासींनी गुरांच्या मागोवा घेताना लुईझा पॉईंटजवळील घळीत एक सडलेला मृतदेह सापडला.
हा मृतदेह निशांतचाच असल्याचं त्याच्या आईवडिलांनी सांगितलं. कारण, तो घरातून ज्या कपड्यांवर बाहेर पडला होता, तेच कपडे मृतदेहाच्या अंगावर होते. त्याचा फोनही तिथेच होता. मृतदेह पूर्णतः सडल्याने त्याची ओळख कपडे आणि फोनवरून पटवण्यात आली.



























































