कर्मचाऱ्याच्या एका चुकीमुळे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअप बंद पडले, फेसबुकशी निगडीत व्यक्तीनेच उजेडात आणली गोपनीय माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेसबुक आणि इतर सेवा बंद पडल्याने फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने माफी मागितली आहे. सोमवारी जो घोळ झाला त्यामुळे मार्कला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. मात्र नेमका घोळ काय होता आणि तो का झाला हे अनेकांना अद्याप कळू शकलं नव्हतं. फेसबुकने सेवा बंद होण्याला मुख्य सर्व्हरना सदोष अपडेट पाठवणे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या सदोष अपडेटमुळे सर्व्हरचा इंटरनेटशी असलेला संपर्क तुटला होता. याच अपडेटमुळे फेसबुकच्या सेवा सुरळित करण्यासाठी लागणारी साधने बंद झाली होती.

बंद पडलेले सर्व्हर सुरू करणं हे शक्य होतं, सर्व्हर हा स्वयंचलित पद्धतीने सुरू झाला नाही तर ते काम मानवी मदतीने करता येतं. कोरोना काळामध्ये फेसबुकने सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. यामुळे इंजिनिअर्स हे गरी बसून काम करत होते. ऑनलाईन पद्धतीने आणि अ‍ॅटोमॅटीक पद्धतीने (स्वयंचलित) सर्व्हर सुरू करता येत नाही हे कळाल्यानंतर ते सुरू करण्यासाठी या इंजिनिअर्सनी कार्यालयात धाव घेतली होती. इंजिनिअर्सना कार्यालयात पोहोचून सर्व्हर सुरू करण्यासाठी बराच वेळ गेला होता, ज्याचा फटका फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअप वापरणाऱ्यांना बसला आहे. फेसबुकमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने चुकीने ‘कोड’चा मोठा भाग डिलीट केला होता असं आतमधल्याच एका व्यक्तीने सांगितलं आहे असं डेली मेल या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटलंय. या चुकांमुळे फेसबुकच्या सगळ्या सेवा बंद पडल्या असं सांगितलं जात आहे.