ड्रग्ज पेडलर समाज व तरुणांसाठी अत्यंत घातक, सत्र न्यायालयाने ठोठावली पेडलरला दहा वर्षांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ड्रग्ज पेडलर समाज आणि विशेषतः तरुणांसाठी अत्यंत घातक असून ड्रग्ज पेडलरमुळे समाजाची एक प्रकारे हानी होतेय. एवढेच काय तर पेडलर सामाजिक संस्कृती व आरोग्य दूषित करतात, असे स्पष्ट करत एनडीपीएस विशेष न्यायालयाने पेडलरला दिलासा देण्यास नकार दिला. त्याचबरोबर आरोपीला दहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा व एक लाख रुपये दंड ठोठावत आरोपीची मागणी फेटाळून लावली.

मुंबई ते मस्कत आणि पुढे ओमान ते दुबई असा प्रवास करणाऱया इब्राहिम खान (53) हा अमली पदार्थाची तस्करी करत असल्याची माहिती कस्टमच्या एअर इंटेलिजेन्स युनिटला मिळाली. मुंबई विमानतळावर खान याला अटक करण्यात आली. अधिकाऱयांनी त्याच्याकडून अमली पदार्थ व 68 हजार 500 रुपये रोख जप्त केली. आरोपीवर विशेष एनडीपीएस कोर्टात खटला चालवण्यात आला. त्यावेळी न्यायाधीश ए. ए. जोगळेकर यांनी आरोपीला दिलासा देण्यास नकार देत सुटका करण्याची आरोपीची मागणी फेटाळून लावली. एवढेच नव्हे तर गुन्हेगाराने केलेली कृती ही समाजासाठी धोकादायक असून ड्रग्ज पेडलर समाजाचे व तरुणांचे अतोनात नुकसान करत आहेत. त्यामुळे अशा आरोपींना दया दाखवता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत आरोपीला दहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा व एक लाखाचा दंड ठोठावला.