
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केवळ आरोप करण्यापेक्षा पुरावे सादर करावेत. लोकही आता याकडे करमणूक म्हणून बघत आहेत. फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर बेहिशेबी संपत्ती असल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांनी सादर केलेले आकडे आले कुठून, याबाबत काहीच पुरावे दिले नाहीत,’ असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.
नागपूरच्या रविभवन येथे पत्रकारांशी बोलताना अॅड. आंबेडकर यांनी चौकशी एजन्सींचा गैरवापर सुरू असल्याची टीका केली. ‘चौकशी एजन्सीकडून छापे टाकण्यात येतात. याची संपूर्ण माहिती जनतेसमोर यायला हवी. संबंधित व्यक्तीवर ‘एफआयआर’ करून चार्जशिट दाखल व्हायला हवी. जे चौकशी अधिकारी असे करणार नाहीत त्या अधिकाऱ्यांवरच लुटमारीचा गुन्हा दाखल व्हावा,’ अशी आक्रमक भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.
चौकशी एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांचे बाहुले होऊ नये
चौकशी एजन्सीवर बंधने येण्याची गरज आहे. कायद्याने छापा टाकल्यानंतर 190 दिवसांत एफआयआर दाखल होऊन प्रकरण न्यायालयात पोहोचणे आवश्यक आहे. काम करताना अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांचे बाहुले होऊ नये. असे प्रकार सर्रास होत असतानाही अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पाऊल उचलण्यात येत नाही,’ अशी खंत आंबेडकर यांनी व्यक्त केली.
हे राजकीय छापे
ईडीसारख्या संस्थांचा वापर करून छापे टाकले जातात मात्र हे छापे शेवटाला जात नाहीत. त्यामुळे हे छापे केवळ राजकीय असल्याची धारणा लोकांमध्ये निर्माण होते. टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील पुरावेही न्यायालयात सादरच झाले नाहीत. नेत्यांचे राजकीय करीअर संपवण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. चौकशीनंतर त्यांना निर्दोष सोडले जाते, मात्र या काळात राजकीय करीअरला फटका बसत असतो, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.


























































