
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोमवारी चारधाम यात्रेचा जुना मार्ग शोधण्यासाठी 25 सदस्यांच्या टिमला हिरवा झेंडा दाखवत रवाना केलं आहे. हिमालयातील हा मार्ग 1200 किमीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. लोककथेनुसार, हा मार्ग 3,000 वर्षे जुना असून याच मार्गाने पांडवांनीही चारधामची यात्रा केली होती.
चारधामचा जुना मार्ग शोधण्यासाठी निघालेली ही टीम संपूर्ण मार्गाचा अभ्यास करेल आणि व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीसह एक-एक करून माहिती गोळा करेल. ही टीम 50 दिवसांत सुमारे 1200 किमीचा जुना मार्ग कव्हर करेल. या टीममध्ये एसडीआरएफ, पर्यटन, पर्वतारोहण क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या टीमला ट्रक करता यावे म्हणून त्यांच्याकडे जीपीएस यंत्रणाही देण्यात आली आहे.
हा आहे चारधाम यात्रेचा जुना मार्ग
पूर्वी चारधाम यात्रा ऋषिकेशहून पायी केली जात होती. ज्यामध्ये प्रवासी ऋषिकेश, देवप्रयाग, टिहरी, यमुनोत्री, गंगोत्री धाम मार्गे बुधकेदार, केदारनाथ, त्रियुगीनारायण, उखीमठ, चोपता, गोपेश्वर या मार्गे बद्रीनाथला पोहोचायचे. ही टीम या मार्गाचे सर्वेक्षण करून संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार करणार आहे.




























































