नगर जिल्हा रुग्णालयाकडून खासगी रुग्णालयाला बेकायदा वीजजोडणी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी आपत्कालीन वापर करण्याकरिता नगर येथील सबस्टेशनमधून जिल्हा रुग्णालयापर्यंत कायद्याने ‘सिंगल पॉइंट ऑफ यूज’ असा उद्देश असलेली 11 किलोव्हॅट एक्स्प्रेस फिडर वीजजोडणी दिली गेली. त्यानंतर कायद्याला चक्क बगल देत त्यातूनच 1 किलोमीटर लांबीचा हाय-वे ओलांडून एका खासगी मल्टिसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला व्यावसायिक वापरासाठी बेकायदा वीजजोडणी देण्यात आली. परिणामी ओव्हर लोड होऊन शॉर्ट सर्किट झाले आणि जिल्हा रुग्णालयात आगीची दुर्घटना घडली असल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केला आहे.

नगर जिल्हा रुग्णालयापर्यंत आलेली 11 केव्ही एक्स्प्रेस फिडर विद्युत लाइन ही एकमेव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेदेखील अशा स्वतंत्र एक्स्प्रेस फिडर विद्युत जोडणीची मागणी केली होती. एक्स्प्रेस फिडर वीजपुरवठा करण्यासाठी अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. तसेच, त्यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्चदेखील आहे. 2018 मध्ये एका खासगी मल्टिसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने त्यांच्या व्यावसायिक वापरासाठी अशाच प्रकारच्या हाय टेन्शन विद्युत लाइन (एचटी) जोडणीसाठी वीज कंपनीकडे अर्ज केला होता. अशी जोडणी हवी असेल तर जिल्हा रुग्णालयाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र आवश्यक होते. त्यासाठी प्रयत्न केल्यानंतर जिल्हा रुग्णालयाने महावितरण कंपनीला तसे पत्र दिले व ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची मागणी केली. 2018 साली सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे तत्कालीन उप अभियंत्यांनी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र देऊन जिल्हा रुग्णालयाकडेच ‘ना हरकत’ प्रमाणत्राची मागणी केली. या पत्राची दखल घेत जिल्हा रुग्णालयाने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले.

या पत्रांचा आधार घेत एकमेकांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर या ‘सिंगल पॉइंट ऑफ यूज’ उद्देश असलेल्या एक्स्प्रेस फिडर वाहिनीतून बेकायदेशीररीत्या सदर हॉस्पिटललाही व्यावसायिक वापरासाठी विद्युतजोडणी दिली गेली. विद्युत कायद्याला बगल देत आणि कायद्यातील उद्देशाला हरताळ फासत ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचा परिणाम म्हणूनच ओव्हर लोड होऊन शॉर्ट सर्किट झाले आणि त्यातूनच दहा कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात 18 ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती, असे जाधव यांनी म्हटले आहे.

दुर्घटनेशी महावितरणचा संबंध नाही

नगर जिल्हा रुग्णालयांतर्गत असलेली महावितरणच्या एक्स्प्रेस फिडरची वीज तेथून खासगी रुग्णालयाला दिली असून, महावितरणने जिल्हा रुग्णालयातून खासगी हॉस्पिटलला बेकायदेशीर वीजजोडणी देण्यात आल्याचे सांगण्यात आल्यानंतर महावितरणकडून याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात नालेगाव या विद्युत उपकेंद्रावरून दोन उच्च दाबाच्या जोडण्या एक्स्प्रेस वाहिन्यांच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. यासोबतच याच वाहिनीवर दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या साईदीप हेल्थ केअर ऍण्ड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या खासगी रुग्णालयाला उच्चदाबाची जोडणी दिलेली आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या ना हरकत व संमती पत्रानुसार तसेच विद्युत नियमांचे व मानक पद्धतीचे पालन करून महावितरणने ही वीजजोडणी दिलेली आहे. शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या कक्षात झालेल्या दुर्दैवी घटनेशी या वाहिनीच्या जोडणीचा संबंध नसल्याचे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले आहे.