पहिल्या दिवशी सूर्याची किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दक्षिणायन किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी मावळत्या सूर्याची किरणे सायंकाळी 5.48 वाजता देवीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचून डावीकडे लुप्त झाली.

हेमाडपंथी स्थापत्य शास्त्राचा अद्भूत नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात वर्षातून दोन वेळा तीन दिवसांचा किरणोत्सव सोहळा होतो. कधी ढगाळ, तर कधी कृत्रिम अडथळे येत असले तरी अलीकडे तीन-चार वर्षांत पूर्ण किरणोत्सव सोहळा पाहण्याचे भाग्य भाविकांना लाभले होते. यंदा वर्षातील दुसरा किरणोत्सव सोहळा आजपासून सुरू झाला.

सायंकाळपासूनच सूर्यकिरणांची तीव्रता अपेक्षित असल्याने किरणांनी पूर्ण क्षमतेने मंदिरात मार्गक्रमण केले. सायंकाळी 4.47 वाजता महाद्वार चौकात पोहोचलेली किरणे सायंकाळी 5.37 वाजता खजिना चौकामध्ये आली. त्यानंतर किरणांनी 5.44 वाजता कटांजलाला स्पर्श केला 5.47 वाजता ती चरणापर्यंत पोहोचली. अखेरीस 5.48 वाजता सूर्यकिरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली आणि डावीकडे लुप्त झाली.