किरकोळ कारणावरून वाद झाल्याने प्रेयसीचा गळा आवळून खून, प्रियकर फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किरकोळ कारणावरून वाद झाल्याने संभाजीनगरमध्ये प्रियकाराने 23 वर्षीय प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची घटना गुरू लॉन्सच्या पाठीमागील मैदानात घडली. विशेष म्हणजे आपल्याला काहीच माहीत नसल्याचा आव आणत तो बेपत्ता झालेल्या प्रेयसीचा तिच्या नातेवाईकांसोबत शोध घेत होता. मंगळवारी सकाळी घटना उघड होताच प्रियकर अचानक गायब झाल्याने नातेवाईकांसोसह पोलिसांचा संशय बळावला. मुकुंदवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून प्रियकराचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, दुसऱ्या घटनेत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली असून, त्यास न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. एकापाठोपाठ दोन महिलांच्या खुनाने शहर हादरले आहे.

मुकुंदवाडी, स्वराजनगरातील इंदू बरखू रॉय (23)  ही तरूणी अविवाहित आहे. रॉय कुटुंबीय हे मूळ उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील आहे. इंदू ही एका मोबाईल दुकानात काम करते. सोमवारी नेहमीप्रमाणे ती कामाला गेली होती. रात्री घरी न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. इंदूचे नातेवाईक हे मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले असता त्यांना गुरू लॉन्सच्या पाठीमागील मैदानात एका तरूणीचा मृतदेह सापडल्याचे समजले.

मुकुंदवाडी पोलिसांसह इंदूचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले असता त्यांना मृत तरूणी ही इंदू रॉय असल्याचे दिसून आले. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षण पगारे, उपनिरीक्षक सुखदेव काळे पथकासह घटनास्थळी पोहोचले. मृत इंदू रॉय हिचा गळा आवळल्याचे दिसून आले. तर तोंडावर आणि ओठावर जखमेचे निशाण दिसून आले. तत्काळ मृतदेह श्वविच्छेदनासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी इंदूचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. अहवालावरून मुकुंदवाडी पोलिसांनी राहुल रॉय यांच्या तक्रारीवरून प्रियकर भोलाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपनिरीक्षक सुखदेव काळे करत आहे.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळणाऱ्या पतीला अटक

मुकुंदवाडी, जयभवानीनगरातील गल्ली नं. 12 मधील पोपट रामराव शिनगारे (43) हा नेहमी पत्नी सुनीताच्या चारित्र्यावर संशय घेता होता. संशयावरून मध्यरात्रीच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. भांडण झाल्यानंतर सुनीता झोपली असताना पोपट याने तिचा गळा आवळला. हार्ट अटॅक आल्याचा आव आणत पोपट शिनगारे याने शेजाऱ्यांच्या मदतीने पत्नी सुनीता हीस एमजीएम रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करत तपासाला सुरूवात केली असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करत तपासायला सुरूवात केली असता घाटीच्या डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात सुनीताचा गळा दबल्याने मृत्यू झाल्याचा उल्लेख केला. यावरून पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पोपट शिनगारे यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. मुकुंदवाडी पोलिसांनी सोमवारी रात्री पोपट शिनगारे यास अटक करून आज न्यायालयासमोर उभ केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. व्ही. सापते यांनी त्यास 12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आदेश दिले.