
कांदिवली पूर्व येथील ठापूर व्हिलेज परिसरात 8 एकर जमिनीवर मुंबई महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ड्रीम पार्क आणि सेल्फी पॉइंटचे लोकार्पण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले.
कांदिवलीकरांना सर्व सोयीसुविधांनी युक्त असे उद्यान मिळावे, यासाठी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका, प्रभाग समिती अध्यक्षा माधुरी भोईर यांनी पाठपुरावा केला होता. उद्यान धोरणात बदल केल्यानंतर महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या या उद्यानावर महापालिकेने साडेबारा कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यातून उद्यानात येणाऱया सर्वसामान्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लोकापर्णानंतर आदित्य ठाकरे यांच्याकडे चिपळूण महाड-कोकण पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस, युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, माजी नगरसेवक योगेश भोईर, राज सुर्वे, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सर्वसामान्यांसाठी सोयीसुविधा
महापालिकेने पार्पमध्ये जॉगिंग ट्रक, वॉकिंग ट्रक, ट्वीन टॉवर, परगोला, सेल्फी पॉइंट, म्युझिकल कारंजे, लहान मुलांसाठी अॅम्युजमेंट पार्क, ओव्हर ब्रिज, मियावाकी जंगल, खुले रंगमंच, स्केटिंग ट्रक आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.


























































