
मुंबई परिसरात मोठय़ा प्रमाणात ऑटो रिक्षा चालविल्या जातात. येत्या काळात मुंबईच्या रस्त्यांवर इलेक्ट्रिक रिक्षा धावतील. यासाठी रिक्षा संघटना पुढाकार घेईल. कंपन्यांनीदेखील यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज इलेक्ट्रिक ट्रिओ रिक्षाच्या उद्घाटनावेळी केले.
महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या वतीने उत्पादित करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक ट्रिओ रिक्षाचे लाँचिंग करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, वाढत्या इंधन दरवाढीला आळा घालण्यासोबत पर्यावरणपूरक वाहननिर्मितीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले. उद्योगमंत्री सुभाष देसाई पुढे म्हणाले, इलेक्ट्रिक वाहन उत्पादक आणि ग्राहकांना अनुदान देण्याची नव्या धोरणात तरतूद आहे. या धोरणास विविध ऑटोमोबाईल कंपन्यांकडून प्रतिसाद लाभत आहे. त्यानुसार राज्यात 2030पर्यंत बहुतांश वाहने इलेक्ट्रिक वाहने असतील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
किलोमीटरला 50 पैसे खर्च
महिंद्रा कंपनीने ट्रिओ नावाची इलेक्ट्रिक रिक्षा बाजारात आणली आहे. या रिक्षाची किंमत दोन लाख रुपये इतकी असेल. प्रत्येक किलोमीटरमागे केवळ पन्नास पैसे खर्च येणार आहे. इंधनापोटी लागणारा खर्च वाचत असल्याने रिक्षामालकाला पाच वर्षांत दोन लाख रुपयांपर्यंतची बचत याद्वारे होणार आहे.


























































