
हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर दिली की काही वेळात अन्नपदार्थ घरी येतात. मात्र अंतराळात स्पेस स्टेशनमध्ये काम करणाऱया अंतराळवीरांना काही मागवायचे असेल तर फूड डिलिव्हरी करणार कशी? शास्त्रज्ञांना फूड डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न नुकताच यशस्वी झाला आहे. जगाच्या इतिहासात पहिल्यांदा जमिनीवरून अंतरिक्षात फूड डिलिव्हरी करण्यात आली आहे.
अंतराळात करण्यात आलेली फूड डिलिव्हरी ही आतापर्यंतची सर्वात महाग फूड डिलिव्हरी ठरली आहे. जपानचे अब्जाधीश युसाकू मेजावा यांनी ही कमाल केली आहे. ते स्वतः फूड डिलिव्हरी करायला गेले. ‘उबर ईट्स’कडून ही डिलिव्हरी करण्यासाठी उद्योगपती युसाकू मेजावा यांनी पूर्ण तयारी केली. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी 9 तासांचा प्रवास करून त्यांनी हे अंतर पार केलं आणि स्पेस स्टेशनमध्ये पोहोचले. आपल्यासोबत आणलेलं फूड पॅकेट त्यांनी अंतराळवीरांच्या दिशेने फेकले. गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे ते पॅकेट तरंगत अंतराळवीरांपर्यंत पोहोचले. उबर ईट्सकडून याबाबतचा व्हिडीओ तयार केला आहे.























































