एलआयसीच्या जमिनीवरील चाळींचा पुनर्विकास करा, शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत एलआयसी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या चाळींमध्ये हजारो रहिवासी राहतात. या चाळी 100 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असून मोडकळीस आल्या आहेत. तेथील रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. त्यामुळे या चाळींच्या पुनर्विकासासाठी शिवसेनेने केंद्र सरकारकडे जोरदार आग्रह धरला आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. दक्षिण मुंबईत गिरगाव येथे एलआयसीच्या जमिनीवर आंग्रेवाडी चाळ, बदामवाडी, देवकरण नाणजी या 100 वर्षांहून जुन्या चाळी आहेत. जीर्णावस्थेमुळे या इमारती दुरुस्ती करण्यापलीकडे गेल्या असून लवकरात लवकर पावले न उचलल्यास तेथील रहिवाशांच्या जीवितास धोका संभवतो. त्यामुळे या चाळींचा पुनर्विकास एलआयसीने करावा किंवा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला (म्हाडा) पुनर्विकास योजना राबविण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती अरविंद सावंत यांनी या निवेदनात केली आहे. त्यावर डॉ. कराड यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली आणि लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती खासदार सावंत यांनी दिली.