शिवसैनिक सुमंत रुईकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते सुमंत मोहनराव रुईकर (48) यांचे शनिवार, 25 रोजी  सायंकाळच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, मुलगी, मुलगा व भाऊ असा परिवार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुमंत रुईकर व त्यांचा अन्य एक मित्र हे तिरूपती बालाजीला पायी गेले होते. प्रवास चालू असताना त्यांना दोन-तीन दिवस ताप आला होता. अंगात ताप असताना पायी चालणे सुरूच होते. त्यादरम्यान त्यांना कर्नाटक राज्यातील रायचूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. रुईकर यांच्या मृत्यूने बीड शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रभागी असणाऱ्या सुमंत रुईकर यांचा मित्रपरिवार सर्व पक्षांमध्ये होता. मनमिळावू आणि प्रत्येकाच्या मदतीला धावणारी व्यक्ती म्हणून रुईकर यांच्याकडे पाहिले जात होते.

सुमंत रुईकर यांनी यापूर्वीही 2019 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बीड ते तिरूपती बालाजी पायी यात्रा पूर्ण केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुमंत रुईकर यांच्या नि‰sचे कौतुक करत त्यांचा सत्कारही केला होता. बीड ते तिरूपती या प्रवासात पायी जाताना गावागावांत त्यांनी शिवसेनेच्या प्रसाराचे कामही केले होते. आज रविवारी बीडच्या वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.