रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये पंचिंगसाठी रांगा…बायोमेट्रिकमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे ओमायक्रोनच्या संसर्गाची भीती असताना रेल्वेच्या कारखान्यांमध्ये मात्र बायोमेट्रिकसाठी रांगा लागत आहेत. ओमायक्रोनपासून वाचण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखण्याचे सरकार एकीकडे आवाहन करीत आहे, तर दुसरीकडे बायोमेट्रिकसाठी रांगा लावाव्या लागत असल्याने रेल्वेचे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. त्यातच दादर-माहीम-धारावी परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्याने पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोअर परळ, महालक्ष्मी तसेच माटुंगा कारखान्यात कामगारांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट मुख्यालय, मुंबई सेंट्रल येथील डीआरएम कार्यालय तसेच रेल्वेच्या इतर कोणत्याही कार्यालयात तूत बायोमेट्रिक पंचिंग नसताना केवळ पश्चिम रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये कामगारांची मॅन्यूअल हजेरी न नोंदविता बायोमेट्रिक मशीनवर थम्प इप्रेशन देऊन तसेच चेहऱयाची ओळख पटवून प्रत्येक पाळीतील कर्मचाऱयांची नोंद ठेवली जात आहे. या प्रकारासाठी गेटवर रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे कसलेही सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. बायोमेट्रिक पंचिंगकरिता सकाळी सुमारे दीड ते दोन किलोमीटरची रांग लागते. पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱयांची घरे विरार, बदलापूर आणि पनवेल अशा ठिकाणी दूरवर आहेत. त्यामुळे घरातून लवकर बाहेर पडावे लागत असल्याची कर्मचाऱयांची तक्रार आहे.

मशीनवर चेहरा दाखवावा लागतो

बायोमेट्रिकमध्ये थम्प इप्रेशनबरोबरच कामगारांना सीसीटीव्हीमध्ये आपला मास्क उतरवून चेहराही दाखवून ओळख पटवावी लागत असल्याने या रांगा वाढत चालल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे बायोमेट्रिक प्रणाली कोरोनाकाळात काही दिवस थांबवून मॅन्युअली कार्ड पंचिंग करावे अशी मागणी होत आहे. तसेच रेल्वे कर्मचाऱयांना बूस्टर डोस देण्यात यावेत अशी मागणी कर्मचाऱयांनी केली आहे.

मेट्रोप्रमाणे आरएफआयडी प्रणाली येणार

पश्चिम रेल्वे आता मेट्रोच्या तिकिटासाठी वापरण्यात येणारी अत्याधुनिक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन (आरएफआयडी) प्रणाली पंचिंगसाठी वापरण्याचा विचार करीत आहेत. या आधुनिक प्रणालीत नुसते स्मार्टकार्ड मशीनला टेकवले तरी कर्मचाऱयाची हजेरी नोंदविली जाते. आरएफआयडी आणि सीसीटीव्हीच्या मदतीने कामगारांची नोंद घेण्याच्या या प्रणालीचे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांच्या उपस्थितीत सादरीकरण केले जाणार आहे.