निळवंडेचे कालवे वेड्या बाभळींनी वेढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर नगर जिह्यातील दुष्काळी टापूतील गावांना वरदान ठरणाऱया निळवंडे धरणाचे काम झाले. मात्र, कालव्यांच्या कामांना वेग नसल्यामुळे राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात काम पूर्ण झालेले कालवे वेडय़ा बाभळींनी वेढले आहेत. विशेष म्हणजे, याच भागात आजपर्यंत कालव्यांची तीनदा कामे झाली आहेत.

50 वर्षांपूर्वी उत्तर नगर जिह्यातील जिरायती व कायमच दुष्काळी टापूतील 182 गावांतील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी निळवंडे धरणाचा प्रस्ताव करण्यात आला. गेल्या 50 वर्षांत धरण बांधून झाले. त्यात पाणीही साठविले जात आहे. मात्र, कालवे नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीला व पिण्यासाठी पाणी मिळाले नसल्याचे वास्तव आहे. त्यातच चालू वर्षी प्रकल्पासाठी बऱ्यापैकी निधी मिळाला होता. त्यातील मोठा भाग भूसंपादनासाठी खर्च झाला आहे.

कालव्यांची कामे 60 टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पूर्ण होऊन पाणी मिळण्याची वाट चातकाप्रमाणे लाभधारक शेतकरी पाहत आहेत. मात्र, कालव्यांच्या कामांना वेग नसल्यामुळे पिंपरी निर्मळ शिवारात काम पूर्ण झालेले कालवे वेडय़ा बाभळींनी वेढले आहेत. विशेष म्हणजे, याच भागात आजपर्यंत कालव्यांची प्रथम रोजगार हमी योजनेतून दोनदा यांत्रिकीकरणातून अशी तीनदा कामे झाली आहेत. मात्र, कालवे वाहते न झाल्याने या कालव्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर झाडेझुडपे, वेडय़ा बाभळी उगवल्या आहेत. त्यासाठी पाटबंधारे विभागाला पुन्हा चौथ्यांदा येथे निधी खर्च करून काम करावे लागाणार असल्याचे चित्र आहे.

जूनमधील प्रस्तावित चाचणीवेळी येणार अडचणी

पिंपरी निर्मळ शिवारातून सुरू होणाऱया निळवंडेच्या अंत्य कालव्यांचे काम सध्या सुरू आहे. मात्र, या कामाला फारसा वेग नसल्यामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू झालेल्या कामाने 50 टक्के काम पूर्ण करण्याचा टप्पाही गाठला नाही. पाटबंधारे विभागाकडून चालू वर्षी जूनमध्ये मुख्य कालव्याची चाचणी घेण्याचे धोरण असताना रेंगाळलेली कामे व पूर्ण झालेल्या कालव्यांमध्ये उगवलेल्या वेडय़ा बाभळींमुळे नवीन समस्या निर्माण होणार आहे.