टाटा ओपनमध्ये रामकुमारला थेट प्रवेश, 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत रंगणार स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानचा अक्वल मानांकित टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले असून त्याला एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळणार आहे. चौथ्या पर्वातील ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे.

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये बहारीन, मानामा येथील एटीपी स्पर्धेत रामकुमार याने विजेतेपद पटकावले होते आणि अक्वल 200 खेळाडूंच्या यादीत आपले स्थान निश्चित केले होते. 2017 मध्ये त्याने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या डोमिनिक थीमचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. टाटा ग्रुप प्रायोजित व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) वतीने आयोजित दक्षिण आशियातील एकमेव 250 स्पर्धा असलेल्या या स्पर्धेत सलग चौथ्या वर्षी रामकुमार सहभागी होत आहे. तसेच एकेरी गटाबरोबरच रामकुमार दुहेरीत रोहन बोपन्नाच्या साथीत मुख्य ड्रॉमध्ये खेळणार आहे.